पुणे: गणेशोत्सवासाठी शहरातून मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खासगी प्रवासी बस कंपन्यांनी प्रवाशांची लूट करू नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचे पाऊल उचलले. मात्र, आरटीओकडून कारवाईचे प्रमाण नगण्य असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पुण्याहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खासगी बस महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. याव्यतिरिक्त मुंबईहून येणाऱ्या पाचशे खासगी बस पुण्यातून पुढे मार्गस्थ होतात. पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी असते. प्रवाशांची संख्या वाढल्याने बसचे भाडे वाढविण्याचे प्रकार केले जातात. हे रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने खासगी बस कंपन्यांना तंबी दिली होती. प्रत्यक्षात मात्र, आरटीओकडून आतापर्यंत फारशी कारवाई झालेली नाही. केवळ काही बसवर दिखाऊ कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा… पुणे: एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड
खासगी प्रवासी बसने एसटी बसच्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन आरटीओने केले आहे. प्रवासी हे ई-मेल rto.12-mh@gov.in येथेही तक्रार पाठवू शकतात. याबाबतचे कमाल भाडेदर सरकारने २७ एप्रिल २०१८ रोजी निश्चित केले आहेत. काही खासगी प्रवासी बस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येतात. जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक-चालक यांनी नियमानुसार प्रवासी तिकीटदराची आकारणी करावी, असेही आरटीओने म्हटले आहे.
प्रवाशांची गर्दी कमी असल्याचा दावा
करोना संकटापासून प्रवासी संख्येत घट झाली आहे. यंदा गणेशोत्सवाच्या काळातील प्रवासी संख्या करोनापूर्व काळाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्क्याने कमी आहे, असा दावा पुणे बस ओनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष किरण देसाई यांनी केला. ते म्हणाले की, करोनापूर्व पातळीवर अद्याप प्रवासी संख्या पोहोचलेली नाही. प्रवाशांची संख्या कमी असल्याने बस भाड्यात वाढ करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. एसटीच्या दीडपट भाडे मर्यादेपेक्षाही आमचे भाडे कमी आहे.