वाहन चालविण्यासाठी शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आयटीओ) यापूर्वी ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ची अंमलबजावणी सुरू केली होती. त्या पाठोपाठ आता डिसेंबरच्या पहिल्याच दिवसापासून वाहन चालविण्याचा पक्का परवाना मिळविण्यासाठीही ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ सक्तीचे करण्यात आले आहे. कामात सुसूत्रता येण्यासाठी व नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी ही योजना असली, तरी ती एकदमच नव्हे, तर टप्प्याटप्प्याने लागू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची वेळी पक्की करण्याची पद्धत सध्या कार्यरत आहे. शिकाऊ वाहन परवाना मिळाल्यानंतर पक्का परवाना मिळविण्यासाठी थेट कार्यालयात यावे लागत होते. त्यामुळे आता पक्का परवाना मिळविण्यासाठीही ऑनलाइनचा फंडा सुरू करण्यात आला आहे. परिवहन अयुक्तांच्या सूचनेनुसार ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबरच आळंदी रस्ता येथील चाचणी मैदान, िपपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर व अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ घेण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
 ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ घेऊन येणाऱ्या नागरिकांचेच अर्ज पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी स्वीकारण्यात येणार आहेत. ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ न घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्याच्या परवान्याची सुविधा दिली जाणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ नेमकी कशी घ्याल?

* ऑनलाइन अर्ज सादर करणार असलेल्या संगणकावर अ‍ॅक्रोबॅट रिडर व्हर्जन ९. एक्स व इंटरनेट एक्सप्लोरर ७.० ही प्रणाली सुरू असावी.
* vahan.nic.in या संकेतस्थळावरील ड्रायव्हिंग लायसन्स या ऑप्शनवर क्लीक करावे किंवा sarathi.nic.in या संकेतस्थळावरील ‘इश्यू ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स टू मी’ या ऑप्शनची निवड करावी.
* संगणकावर येणारा अर्ज पूर्णपणे भरावा. सबमिट या बटनावर क्लीक करून अर्ज पाठवावा (अर्जातील पार्ट-सी व त्यापुढील माहिती भरू नये.) अर्जदाराने वेब अ‍ॅप्लिकेशन क्रमांक लक्षात ठेवून मुख्य पानावरील प्रिंट ऑप्शनमध्ये जाऊन अर्जाची प्रिंट काढावी.
* चाचणीसाठी वेळेची निवड करण्यासाठी संकेतस्थळावरील अपॉइंट फॉर डीएल टेस्ट या पर्यायाची निवड करा. अपॉइंटमेंट फॉर स्लॉट बुकींवर क्लीक करा. वेब अ‍ॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख तसेच व्हेरिफिकेशन कोश टाकून ओके बटन क्लीक करा.
* कन्फर्म टू बुक या ऑप्शनवर क्लीक करवा. तिथे दिनदर्शिका येईल. त्यातील हिरव्या रंगाच्या तारखा दिसतील. (उपलब्ध असलेल्या तारखा) त्यातील सोयीची तारीख व वेळ निवडून ‘बूक स्लॉट’ या बटनावर क्लीक करा. त्यानंतर आपल्या मोबाइलवर एसएमएसद्वारे सेक्युरिटी कोड पाठविला जाईल. हा कोड रिकाम्या जागी घातल्यास अपॉइंटमेंट बुक होईल. त्याच्या रिसीटची प्रिंट काढून ती अर्जासोबत जोडावी व दिलेल्या वेळेला कार्यालयात उपस्थित राहावे.

‘‘परिवहन कार्यालयाने सुरू केलेली ऑनलाइन अपॉइंटमेंटची नवी पद्धत वाहन कायद्यात न बसणारी नाही. पूर्वीच्याच यंत्रणेमध्ये मोठे दोष आहेत. ते दूर न करता नवी योजना सुरू करणे योग्य नाही. याबाबत आम्ही परिवहन आयुक्तांना भेटलो. पूर्वीची ओरिएंट पद्धत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. वाहन परवाना मागणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता कर्मचाऱ्यांचीही वाढ झाली पाहिजे.’’
– राजू घाटोळे, अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन

Story img Loader