वाहन चालविण्यासाठी शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आयटीओ) यापूर्वी ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ची अंमलबजावणी सुरू केली होती. त्या पाठोपाठ आता डिसेंबरच्या पहिल्याच दिवसापासून वाहन चालविण्याचा पक्का परवाना मिळविण्यासाठीही ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ सक्तीचे करण्यात आले आहे. कामात सुसूत्रता येण्यासाठी व नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी ही योजना असली, तरी ती एकदमच नव्हे, तर टप्प्याटप्प्याने लागू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची वेळी पक्की करण्याची पद्धत सध्या कार्यरत आहे. शिकाऊ वाहन परवाना मिळाल्यानंतर पक्का परवाना मिळविण्यासाठी थेट कार्यालयात यावे लागत होते. त्यामुळे आता पक्का परवाना मिळविण्यासाठीही ऑनलाइनचा फंडा सुरू करण्यात आला आहे. परिवहन अयुक्तांच्या सूचनेनुसार ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबरच आळंदी रस्ता येथील चाचणी मैदान, िपपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर व अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ घेण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ घेऊन येणाऱ्या नागरिकांचेच अर्ज पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी स्वीकारण्यात येणार आहेत. ‘ऑनलाइन अपॉइंटमेंट’ न घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्याच्या परवान्याची सुविधा दिली जाणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा