मोटार मागे घेत असताना वेगवेगळय़ा प्रकारे सायरनसारखे वाजणारे रिव्हर्स हॉर्न आता बंद होणार आहेत. विविध नागरिक व संस्थांकडून करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटारीसाठी वापरल्या जाणाऱ्या अशा रिव्हर्स हॉर्नला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या सूचनाही कार्यालयाने काढल्या असून, रिव्हर्स हॉर्न असणाऱ्या मोटारीवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रिव्हर्स हॉर्नबरोबरच कर्कश हॉर्न असणाऱ्या मोटारीही ‘आरटीओ’कडून लक्ष्य करण्यात येणार आहेत.
मोटारीचा रिव्हर्स हॉर्न बहुतांश वेळेला मोटारमालकाकडून बसवून घेतला जातो. त्याचप्रमाणे मुख्य हॉर्नमध्येही बदल करून त्या जागी जास्त डेसिबलचा हॉर्न बसविला जातो. रुग्णालय किंवा शांतता क्षेत्र असलेल्या भागामध्ये हॉर्न वाजविण्यास बंदी असते, मात्र अशा ठिकाणीही सर्रास मोठमोठय़ाने हॉर्न वाजविले जातात. पुण्यासारख्या शहरातील वाहतूककोंडी लक्षात घेता प्रत्येक रस्त्यावर हवेच्या प्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषणाची पातळीही मोठी असल्याचे दिसून येते.
मोटार मागे घेत असताना वाजणारा रिव्हर्स हॉर्नचा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी मोठा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडेही अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. कॉल सेंटर किंवा रात्री कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा रात्री रिव्हर्स हॉर्न वाजल्यास अनेकदा वादावादी होते. त्यामुळे अशा काही वाहनांचे हे हॉर्न संबंधित कंपन्यांनी पूर्वीच काढले आहेत, मात्र खासगी प्रकारातील बहुतांश मोटारींना मल्टिटोन व रिव्हर्स हॉर्न असतात.
सोसायटय़ांमध्ये मोटार पार्किंग करताना हे हॉर्न रात्री-बेरात्री वाजतात. रुग्णालयांच्या आवारातही त्याचा आवाज येतो. त्यातून रुग्ण व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, अशा हॉर्नवर बंदी घालण्याच्या मागणीबाबत आरटीओकडे निवेदने देण्यात आली होती. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम ११८ अनुसार मल्टिटोन हॉर्न व कर्कश हॉर्न वाहनास बसविणे व ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचा हॉर्न बसविणे कायद्याने गुन्हा आहे. हरित लवादानेदेखील मर्यादेपेक्षा जास्त डेसिबलच्या हॉर्नवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे आरटीओने स्पष्ट केले आहे. सर्व गोष्टींचा विचार करून असे हॉर्न काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले असून, कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
‘‘नागरिकांना आवाहन करण्यात येते, की त्यांनी मोटारींना रिव्हर्स हॉर्न बसविले असल्यास किंवा दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त डेसिबलचे हॉर्न बसविले असल्यास ते तातडीने काढून टाकावेत, अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.’’
– जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी