पुणे : देशभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ऑनलाइन यंत्रणा गुरुवारी आणि शुक्रवारी ठप्प झाली. त्यामुळे परवान्याशी निगडित एकही सेवा नागरिकांना मिळाली नाही. राष्ट्रीय सूचना केंद्रातील सर्व्हरमधील बिघाडामुळे ऑनलाइन यंत्रणा बंद झाली होती. ही यंत्रणा शुक्रवारी सायंकाळी पूर्ववत करण्यात यश आले. राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) सर्व्हरमध्ये गुरुवारी सकाळी बिघाड झाला. त्यामुळे देशभरातील आरटीओमधील ऑनलाइन यंत्रणा बंद झाली. आरटीओमधील अनेक सेवा नागरिकांना ऑनलाइन मिळतात. त्यातील वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना, परवान्याचे नूतनीकरण, परवान्यावरील पत्ता बदलणे, बनावट परवाना काढणे यासह परवान्याशी निगडित सर्व सेवा बंद झाल्या. ऑनलाइन यंत्रणा बंद झाल्याने नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येण्यासोबत आरटीओतील कामकाजालाही मोठा फटका बसला.
सर्व्हरमधील बिघाडाबाबत एनआयसीने गुरुवारी सुरुवातीला परिवहन विभागाला दोन तासांत यंत्रणा सुरू होईल, असे कळविले. मात्र, बिघाड दूर करून एनआयसीला यंत्रणा सुरू करण्यात गुरुवारी अपयश आले. त्यानंतर शुक्रवारी एनआयसीकडून बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी एनआयसीने बिघाड दूर केल्यानंतर आरटीओतील ऑनलाइन यंत्रणा सुरू झाली. ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने दोन दिवस परवान्याशी निगडित सर्व सेवा बंद राहिल्या.
राष्ट्रीय सूचना केंद्राकडून आरटीओतील ऑनलाइन यंत्रणेची सेवा दिली जाते. त्यांच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने देशभरातील आरटीओमधील यंत्रणा बंद झाली होती. एनआयसीने सर्व्हरमधील बिघाड दूर केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ऑनलाइन यंत्रणा सुरू झाली. – संदेश चव्हाण, उपायुक्त, परिवहन विभाग
हेही वाचा…पिंपरी: रावेतमध्ये निवासी शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संचालकासह माजी विद्यार्थिनी अटकेत
राज्यभरातील आरटीओतील ऑनलाइन सेवा मागील दोन दिवसांपासून नागरिकांसाठी बंद आहेत. ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने आरटीओतील कामकाजही ठप्प आहे. नागरिकांना याची माहिती न देण्यात आल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. – विजयकुमार दुग्गल, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना