पुणे: पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील विस्तारित सेवा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने मागील आठवड्यात या मार्गाची तपासणी केली होती. आता केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांच्याकडून शुक्रवारपासून या मार्गाची अंतिम तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळेल.

मागील वर्षाच्या अखेरीस रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी आणि त्यांची मंजुरी घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न होता. मात्र, या मार्गावरील येरवडा स्थानकाचे जिने नगर रस्त्यावर येत होते. महामेट्रोकडून या जिन्यांसाठी खांब उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी वाहतूककोंडी होत असल्याने या कामाला विरोध केला. अखेर महापालिकेने हे जिने दुसरीकडे हलविण्यास महामेट्रोला सांगितले. महापालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रोने येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या रचनेत काही बदल केले. या बदलामुळे येरवडा स्थानकाच्या जिन्याचे काही खांब पाडण्याची वेळ महामेट्रोवर आली. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे पथक मागील आठवड्यात पुण्यात आले होते. या पथकाने विस्तारित मार्गाची आठवडाभर तपासणी केली. या पथकाने काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी मेट्रोकडून दूर करण्यात आल्या आहेत. आता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग या मार्गाच्या तपासणीसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. आयुक्तांनी या मार्गाला हिरवा कंदील दिल्यानंतर महामेट्रोकडून मार्ग सुरू करण्याबाबत राज्य सरकारला पत्रव्यवहार केला जाईल. त्यानंतर राज्य सरकार मार्ग सुरू करण्याची तारीख निश्चित करेल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून रूबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी सुरू आहे. ही तपासणी २२ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर आयुक्तांकडून या मार्गावर सेवा सुरू करण्यास अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय घेतला जाईल.
-अतुल गाडगीळ, संचालक (कार्य), महामेट्रो

हेही वाचा : मोठी बातमी : स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मंजुरी; लवकरच काम सुरू होणार

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग

अंतर – ५.५ किलोमीटर
स्थानके – बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी
सुरू कधी – फेब्रुवारीच्या सुरुवातीला शक्य

Story img Loader