तक्रार करणाऱ्या प्रवाशाला धक्काबुक्की, शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरवले

 पुणे : ‘प्रवासी केंद्रित’ सेवा देण्याचा दावा करणाऱ्या पीएमपीच्या चालक-वाहकाची मुजोरी आणि अरेरावी, तसेच पोलिसांच्याही मग्रुरीचा फटका पीएमपीने प्रवास करणाऱ्या एका सामान्य कुटुंबाला सोमवारी मध्यरात्री बसला. महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर पुरुष प्रवासी बसलेले असल्यामुळे ती जागा पत्नी आणि लहान मुलीला बसण्यासाठी द्यावी आणि वाहकाने त्यासाठी मदत करावी, अशी आग्रही विनंती परोपरीने करणाऱ्या या पीएमपी प्रवाशालाच शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकाराच्या विरोधात पोलीस तसेच पीएमपीच्या तक्रार निवारण केंद्राकडे फोनवरून तक्रार नोंदविल्यामुळे चालक-वाहकाने त्या प्रवाशाला बसमधून खाली उतरविल्याचाही धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रार नोंदविण्यास गेलेल्या या प्रवाशाला पोलिसांचीही मग्रुरी सहन करावी लागली. तक्रार नोंदवून घेणे लांबच, पोलीस ठाण्यातही या प्रवाशाला शिवीगाळ करण्यात आली. पोलीस आणि पीएमपीच्या अशा मुजोर व्यवस्थेने ससेहोलपट झालेल्या या कुटुंबावर रडकुंडीला येण्याची वेळ आली.

पुणे स्टेशन ते कात्रज या रातराणी बसमध्ये हनुमंत पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.पवार पत्नी, लहान मुलगी आणि पुतणी समवेत स्वारगेट येथील पीएमपी स्थानकावर कात्रजला जाण्यासाठी थांबले होते. मुलगी लहान असल्यामुळे ती हनुमंत यांच्या खांद्यावर झोपली होती. कात्रजला जाणाऱ्या बसमध्ये गर्दी असल्यामुळे मुलीला घेऊन ते सर्वात शेवटी गाडीत चढले. पत्नी आणि पुतणी गाडीत पुढे असल्यामुळे मुलीला त्यांनी आईकडे दिले. गाडीतील महिला प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या डाव्या बाजूच्या आसनांवर पुरुषांनी कब्जा केल्यामुळे हनुमंत यांची पत्नीने दोघा तरूणांना जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र जागा देण्यास पुरुषांनी नकार दिला आणि हनुमंत आणि त्यांच्या पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहक सौरव पवार यांनी या तरूणांना जागेवरून उठवावे, असे हनुमंत यांनी सांगितले. मात्र हे काम माझे नाही, तुमचे-तुम्ही पहा, मी तिकीट काढण्याचे काम करत आहे, मला माझे कर्तव्य सांगण्याची आवश्यकता नाही, जहागीरदार आहेस तर चारचाकीतून फिरत जा, असे सांगत वाहक सौरव पवार यांनी हनुमंत यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे गडबडलेल्या पवार यांनी पीएमपीच्या तक्रार निवारण केंद्राकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांनी १०० क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वाहकाने चालकाला गाडी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले आणि पवार यांना गाडीतून खाली उतरविले आणि त्यांची पत्नी, मुलगी,  पुतणी यांना गाडीतून खाली न उतरविता गाडी कात्रजच्या दिशेने मार्गस्थ केली.

या प्रकारामुळे रडकुंडीला आलेल्या हनुमंत यांनी पत्नीशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि कात्रज पोलीस चौकीत जाण्यास सांगितले. गाडीचा मार्ग क्रमांक आणि आरटीओ क्रमांक घेण्याची सूचनाही त्यांनी केली. या दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांनी हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. पण येथेही हद्दीचा वाद निर्माण झाला आणि पोलिसांच्या मग्रुरीचा अनुभव त्यांना आला.

प्रशासनाकडून गंभीर दखल

या प्रकाराची पीएमपी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. वाहक सौरभ पवार हा बदली कर्मचारी असून चालक चंद्रकांत पवार कायमस्वरूपी नेमणुकीस आहे. मंगळवारी त्यांना कामकाज देण्यात आले नाही. बुधवारी त्यांना पीएमपी मुख्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या प्रकारामुळे पीएमपीच्या प्रवासी केंद्रित सेवेचा फुगा फुटला असून चालक-वाहकाच्या मुजोरीला कसे सामोरे जावे लागते, हेच यातून स्पष्ट होत आहे.

परस्परविरोधी तक्रार

या प्रकारानंतर मंगळवारी पवार यांनी पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे आणि पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. शुक्ला यांनी संबंधित पोलिसांना बोलावून चांगलेच खडसावले. या दरम्यान, पोलिसांनी चालक-वाहकाला शोधून संबंधित प्रवाशाविरोधात परस्पर विरोधी तक्रार करण्यास सांगितल्याचीही माहिती पुढे आली आहे.

तक्रोर नोंदवताना हद्दीचा वाद

पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यानंतर पोलीस मार्शल तेथे पोहोचतील, असे पवार यांना सांगण्यात आले. त्यानुसार दोन पोलीस आले आणि त्यांनी पवार यांच्या पत्नीला कात्रज चौकीत तक्रार नोंदविण्यास सांगितले. पवार थांबले होते ती जागा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होती. मात्र तेथे आलेले मार्शल पर्वती चौकीचे होते. त्यामुळे त्यांनी सहकारनगर पोलिसांना फोन केला आणि पोलीस पाठविण्याचा संदेश दिला. या दरम्यान, पत्नीने कात्रज चौकीत तक्रार नोंदविली. सहकारनगर पोलिसांचे पथक हनुमंत यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मात्र तक्रार नक्की कुठे नोंदवायची, यावर एकमत होत नव्हते. अखेर सहकानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे निश्चित झाले. मात्र पोलीस उप निरीक्षक बडे यांनी तक्रार नोंदविण्याऐवजी पवार यांनाच शिवीगाळ केली. तक्रार नोंदविल्याची प्रतही त्यांना देण्यास नकार दिला.