पुण्यातील अनेक शाळांनी शिक्षण हक्क कायद्याला हरताळ फासल्याचे चित्र सध्या दिसत असून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हे शोभेलाच उरले आहे. अनेक शाळांनी नियमानुसार प्रवेशाची यादी शाळेच्या बाहेर लावलेली नाही, शाळा प्रवेशाचे वेळापत्रक पाळत नाहीत, अशा अनेक तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार असलेल्या २५ टक्के आरक्षणातील प्रवेशाचे शिक्षण विभागाने आखून दिलेले वेळापत्रक आता शेवटच्या टप्प्यात असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक शाळांमध्ये अजूनही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक खासगी शाळांमध्ये नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जात नसल्याची तक्रार पालकांकडून आणि विविध संघटनांकडून केली जात आहे. ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया केली आहे, त्यापैकी अनेक शाळांनी नियमानुसार प्रवेश प्रक्रियेची यादी सूचना फलकावर लावलेली नाही. ज्या शाळांमध्ये जागांपेक्षा जास्त अर्ज आले होते, त्या शाळांमध्ये शिक्षणाधिकारी, पालकांचे प्रतिनिधी यांच्यादेखत सोडत काढणे अपेक्षित होते. मात्र, काही शाळांनी तशी सोडत काढली नसल्याची तक्रार संघटनांकडून केली जात आहे. काही शाळांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवलेली नाही. असे अनेक गोंधळ सध्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये होत आहेत.
बिशप्स आणि सेंट जोसेफमध्ये पालकांचे आंदोलन
आरक्षित २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याच्या मुद्दय़ावरून बिशप्स प्रशालेच्या बाहेर पालकांनी मंगळवारी आंदोलन केले. याबाबत पालकांनी सांगितले, की प्रवेश प्रक्रियेची यादी मंगळवारी लावण्यात येणार असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले होते. अनेक पालकांना पाल्याला प्रवेश मिळाल्याचा एसएमएस शाळेकडून मंगळवारी पाठवण्यात आला. त्यानुसार पालक शाळेत गेल्यानंतर त्यांना, एसएमएस चुकून पाठवण्यात आला असून तुम्हाला प्रवेश मिळाला असेल तर ई-मेल पाठवण्यात येईल, असे शाळेकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आलेल्या अर्जामधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यानुसारच प्रवेश देण्यात येणार आहेत. ‘शाळेत अशा प्रकारे पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे असा एसएमएस पालकांना गेला,’ असे स्पष्टीकरण शालेय प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
खडकी येथील सेंट जोसेफ बॉईज स्कूलमध्येही आरक्षणाच्या तरतुदी अंतर्गत केल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. या शाळेबाहेर पालकांनी सोमवारी आंदोलन केले.

Story img Loader