.आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा कुणी घ्यावी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षकानेच सुचवणे आणि विद्यापीठाने त्याच परीक्षकांना नेमणे हे तार्किक नसले तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा प्रकार देखील करून पाहिला आहे.. तो देखील सर्वोच्च पदवी मानल्या जाणाऱ्या पीएच.डीच्या परीक्षेत! आपल्या विद्यार्थ्यांचे प्रबंध तपासण्यासाठी मार्गदर्शकानेच परीक्षकांची नावे सुचवली आहेत. विशेष म्हणजे सुचवलेल्या नावांमधीलच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी करण्यासाठी केलेला जवळपास प्रत्येक नियम विद्यापीठाने पायदळी तुडवला आहे. मात्र आता प्राथमिक पातळीवरील तर्काचाही विचार विद्यापीठाकडून करण्यात येतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी परीक्षक कोण असावेत हे ठरवण्याची मुभाच विद्यापीठाने पीएच.डीच्या काही मार्गदर्शकांना दिली असल्याचा प्रकार समोर येत आहे. विद्यार्थ्यांचा प्रबंध तपासण्यासाठी कुणाकडे पाठवावा त्या परीक्षकांची नावे मार्गदर्शकानीच सुचवली आहेत. विद्यापीठाला नावे सुचवून या परीक्षकांचे बायोडेटाही मार्गदर्शकांनी पाठवले आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठानेही संबंधित विद्यार्थ्यांचा प्रबंध मार्गदर्शकानीच सुचवलेल्या परीक्षकांकडे पाठवला आहे. त्या विद्यार्थ्यांला गेल्यावर्षी विद्यापीठाने पीएच.डी देखील दिली आहे. मार्गदर्शकानी विद्यापीठाला परीक्षकांची नावे सुचवण्यासाठी लिहिलेले पत्र ‘लोकसत्ता’ला मिळाले आहे. विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या पीएच.डीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
आयोगाच्या नियमांनुसार पीएच.डीचा प्रबंध ज्या विद्याशाखेतील असेल त्या विषयातील तज्ज्ञांकडे पाठवण्याचा नियम आहे. या परीक्षकांसाठीही अनुभव, शैक्षणिक पात्रतेचे निकष दिले आहेत. परीक्षकांपैकी एक परीक्षक हा विद्यापीठाच्या बाहेरील असणे आवश्यक आहे. मात्र या परीक्षकांची नावे मार्गदर्शकांनी सुचवावित असा कोणताही नियम नाही.

Story img Loader