महापालिकेच्या विधी विभागाने आदेश धाब्यावर बसवित पॅनेलवरील वकिलांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना दिला आहे.
न्यायालयातील दाव्यांमध्ये महापालिकेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी वकिलांचे पॅनेल महापालिकेच्या विधी विभागाकडून नियुक्त केले जाते. या नियुक्त्या वर्तमानपत्रात जाहीरात देऊन, अर्ज मागवून आणि निवड प्रक्रिया राबवून करणे आवश्यक आहे. मात्र करोना संसर्गाचे कारण पुढे करून या प्रक्रियेला फाटा देण्यात आला आहे. त्यातून त्याच वकिलांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विधी विभागाने आयुक्त विक्रम कुमार यांना दिला आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.
हेही वाचा >>>पुणे : जेवणातून गुंगीचे औषध देऊन नोकराने केली २३ लाख ९८ हजार रूपयांची चोरी
विधी विभाग प्रमुखांनी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन पॅनेलवरील आहे त्याच वकिलांना मुदतवाढ देण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने १३ ऑक्टोबर २०२१ रोजी आयुक्तांना यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांनी मंजुरी देताना नवीन नेमणुकांसाठी एक महिन्यात विधी विभागाने प्रक्रिया राबवावी, अशी अट घातली. मात्र या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी त्यावर कार्यवाही झालेली नाही, असे विवेक वेलणकर यांनी सांगितले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तातडीने पॅनेल वरील वकिलांच्या नेमणुकीसाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश विधी विभाग प्रमुखांना द्यावेत, अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.