दापोडी येथील जलसंपदा विभागाच्या यांत्रिक संघटनेच्या कार्यशाळेची तब्बल १२५ एकर जागा सत्ताधारी नेते व अधिकारी टप्प्याटप्याने हडप करण्याचा डाव आहे, अशी तक्रार शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
दापोडीतील विभागातील प्रादेशिक कर्मशाळा (उपविभाग क्र.३) सोलापूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. हा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबर यांनी दिला आहे. दापोडीत १९४२ पासून जलसंपदा विभागातील यांत्रिकी संघटना ही कर्म(कार्य)शाळा आहे. राज्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांच्या यांत्रिकी कामांसाठी ती कार्यरत आहे. वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोक्याची १२५ एकर जागा असल्याने त्यावर अनेकांचा डोळा आहे. छुप्या पद्धतीने ही जागा मोडीत काढण्याचे षडयंत्र सुरू असून त्यात या विभागाचे अधिकारी आघाडीवर आहेत. संघटनेचा २००८ मध्ये सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम दापोडीत पार पडला. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय कार्यालयाकडे इतकी मोठी जागा आहे, हे आम्हाला दाखवून तुम्ही चूक केली, असे सूचक विधान आबांनी भाषणात केले होते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. आबांनी हे विधान नेमके कोणाला उद्देशून केले होते, ते माहिती नाही. मात्र, त्यांचे म्हणणे खरे करण्याचा छुपा कार्यक्रम जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी चालवला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे येथील एकेक विभाग अन्यत्र स्थलांतरित करण्यात येत आहे. सत्ताधारी नेते व अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने ही जागा मोकळी करून व नंतर ती हडपण्याच्या हालचाली सुरू असल्याची शंका येते. शासनाचा लेखी प्रस्ताव तसेच आदेश नसतानाही मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंत्यांनी तसा प्रस्ताव तयार केला असून हस्तांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे बाबर यांनी म्हटले आहे.
जलसंपदा विभागाची १२५ एकर जागा लाटण्याचा सत्ताधारी व अधिकाऱ्यांचा डाव
दापोडी येथील जलसंपदा विभागाच्या यांत्रिक संघटनेच्या कार्यशाळेची तब्बल १२५ एकर जागा सत्ताधारी नेते व अधिकारी टप्प्याटप्याने हडप करण्याचा डाव आहे, अशी तक्रारखासदार बाबर यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे.
First published on: 06-06-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruling party and officers pocketing 125 acres land of water irrigation gajanan babar