पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची चर्चा पिंपरी चिंचवड शहरात रंगली होती. अखेर यावरील मौन पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सोडलं आहे. विशाल अगरवाल हा आमच्यात अटकेत आहे, तो सुरक्षित आहे. तो सोशल मीडियावरील मॅसेज खोटा आहे. कोणीतरी खोडसाळपणा केला अशी माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली आहे. विशाल अगरवाल याला अटक केल्याबाबत गुप्तता का पाळली याविषयी देखील खुलासा केला आहे. या प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलीस संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याबाबत उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यातील बावधन येथील सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अगरवालला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. यादरम्यान, “विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार” असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलीसांनी खूलासा केला आहे.
नेमकं पोलीस काय म्हणाले?
“विशाल अगरवाल याच्या विरोधात बावधन येथील सोसायटी धारकांची फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अगरवाल याला कोर्टाच्या परवानगी नंतर ताब्यात घेतलं. विशाल अगरवाल हा पोलिसांच्या ताब्यातून फरार ही अफवा आहे. कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे. विशाल अगरवाल आमच्याकडे अटकेत आहे. याची माहिती काही पत्रकारांना होती.” – कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक