पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी मात्र असा कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र काही दिवसांपासून ते अजित पवार यांची साथ सोडणार असून शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा होती. त्यातच सोमवारी सकाळी शरद पवार यांची पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लंके यांचा पक्षप्रवेश होईल, अशी चर्चा सुरू होती.
हेही वाचा : कात्रज घाटात वणवा
पवार यांच्या मोदीबाग या निवासस्थानी लंके उपस्थित असल्याचेही बोलले जात होते. प्रत्यक्षात यासंदर्भात पवार यांना विचारणा केली असता असा कोणताही पक्ष प्रवेश होणार नाही, असे त्यांनी सांगितले. लंके यांच्या पक्षप्रवेशाची बातमी माध्यमातून कळाली आहे. ते आवारात असतील तर त्यांना पत्रकार परिषदेला घेऊन या, असे पवार यांनी सांगत या अफवा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, लंके अस्वस्थ असून येत्या चार ते पाच दिवसात ते पक्ष प्रवेश करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.