‘पुण्यात ‘इबोला’चा संशयित रुग्ण सापडला’ असा मेसेज गुरुवारी दिवसभर ‘व्हॉट्सअॅप’वर फिरत होता. हा मेसेज आला आणि आता स्वाइन फ्लूसारखी इबोलाची साथही पुण्यात येणार की काय, या विचाराने अनेक पुणेकर गोंधळून गेले. अखेर सायंकाळी महापालिकेच्या आणि राज्याच्या आरोग्य खात्याने ‘त्या’ रुग्णाला इबोलाची कोणतीही लक्षणे नसल्याचे स्पष्ट केले आणि तो मेसेज अफवाच असल्याचेही सिद्ध झाले.
पिंपरी-चिंचवडचा एक रहिवासी दुबईहून पुण्यात आला होता. मात्र दुबईच्या आधी तो पश्चिम आफ्रिकेतील ‘गिनिया’ या देशात दोन महिने राहून आला होता. मात्र तपासणीअंती या नागरिकाला ‘इबोला’ची कोणतीही लक्षणे नसल्याचे दिसून आले.
राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. एच. एच चव्हाण म्हणाले, ‘‘एखादा प्रवासी ‘इबोला’चा प्रसार असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये जाऊन आला असेल, तर ते त्याच्या पारपत्रावरून लगेच समजते व विमानतळावर त्या प्रवाशासंबंधी ‘अलर्ट’चा संदेश येतो. विमानतळावर अशा प्रवाशांच्या इबोलासंबंधी तपासण्या करणारी एक रुग्णवाहिका २४ तास कार्यरत आहे. ‘तो’ प्रवासी विमानतळावर उतरल्यानंतर त्याची तपासणी झालीच, पण नंतर संसर्गजन्य रोगांच्या नायडू रुग्णालयातही त्याला तपासण्यात आले. त्यात त्याला इबोलाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे दिसून आले.’’

‘इबोला’संबंधी काही तथ्ये :
– इबोला हा रोग हवेवाटे पसरत नाही.
– निरोगी व्यक्तीचा जर इबोलाग्रस्त रुग्णाचे रक्त, वीर्य किंवा शरीरातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या द्रव्यांशी संपर्क आला तरच त्याला इबोला होण्याची शक्यता असते.’
– सध्या या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेतील गिनिया, लायबेरिया, नायजेरिया आणि सिएरा लिओन याच देशांत आहे.
– काही आफ्रिकन देशांमध्ये अजूनही वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस भक्षण करण्याची पद्धत आहे. इबोलाने ग्रस्त असलेली वटवाघळे, माकडे आणि इतर वन्य प्राण्यांकडून हा रोग माणसांकडे आल्याचे मानले जाते.