- नाणे चलनातून बाद झालेले नाही
जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे स्पष्टीकरण
प्रथमेश गोडबोले, पुणे</p>
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर आता दहा रुपयांचे नाणे चलनातून बाद झाले आहे, दहा रुपयांचे नाणे चलनातून बाद होणार आहे, अशा अफवा सध्या सर्वत्र पसरल्या असून भाजीविक्रेते तसेच छोटे व्यावसायिक, फळवाले, चहा विक्रेते, स्नॅक्स सेंटरचालक दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. समाजमाध्यमातूनही दहा रुपयांचे नाणे बंद झाले आहे, होणार आहे, अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत. या पाश्र्वभूमीवर दहा रुपयांचे नाणे चलनातून बाद झालेले नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
दहा रुपयांचे नाणे बंद करण्याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. दहा रुपयांची बनावट नाणी चलनात आहेत. रुपयाचे चिन्ह असलेली आणि चिन्ह नसलेली दहा रुपयांची सर्व नाणी वैध आहेत. या नाण्यांचा व्यवहारात उपयोग करावा, असे रिझव्र्ह बँकेनेही गेल्या महिन्यात स्पष्ट केले आहे. तरी देखील समाजमाध्यमांमध्ये विशेषकरून वॉट्स अॅपवरून दहा रुपयांची नाणी बंद झाल्याचे संदेश फिरत आहेत. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शासनाकडून दहा रुपयांच्या नाण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. भविष्यातही दहा रुपयांचे नाणे बाद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
- पीएमपीएमएलकडे दहा रुपयांची नाणीच नाणी
पीएमपीमधून प्रवास करणारे प्रवासी वाहकाकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत. उलट तिकीट खरेदी करताना प्रवासी दहा रुपयांची नाणी देतात. वाहकांकडून मात्र सुटे पैसे परत घेताना दहाची नाणी स्वीकारत नाहीत. त्यामुळे पीएमपीएमएलकडे दहा रुपयांची नाणी मोठय़ा प्रमाणावर गोळा झाली आहेत. पीएमपीच्या वाहकांकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात आहेत. याउलट प्रवाशांकडूनच नाणी स्वीकारली जात नाहीत, असे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सांगितले.
उद्योगनगरीत व्यापाऱ्यांकडून नन्नाचा पाढा
बाळासाहेब जवळकर, पिंपरी
दहा रुपयांची नाणी बंद झाली आहेत, अशी आवई उठल्याने व बहुतांश नागरिक तसेच व्यापारीही असेच सांगत सुटल्याने या संदर्भात मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे उद्योगनगरीत दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास कोणी तयार नाही, अशी परिस्थिती दिसू लागली आहे. अशा वातावरणातच, बुधवारी चिखलीतील एका व्यावसायिकाने दहा रुपयांच्या नाण्यांचा स्वीकार होत नसल्याने सरळ बँक गाठली. सहा हजार रुपयांची दहा-दहाची नाणी त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवल्याने मोजदाद करताना त्यांचीही दमछाक झाली.
शहरातील अनेक व्यापारी, दुकानदार दहा रुपयांची नाणी चालत नाहीत, असे ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे स्वीकारताना अनेकांकडून टाळाटाळ होऊ लागली आहे. आपल्याकडील नाणी कसेही करून खपवण्याचा प्रयत्नही अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसू लागले आहे. अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही ओढावले आहेत. अशाप्रकारे कोणतेही आदेश निघालेले नाहीत. मात्र, छातीठोकपणे सांगत नाणी रद्द झाल्याचीच चर्चा नागरिक करत आहेत. अशा संभ्रमी वातावरणाचा फटका चिखलीतील वखार व्यवसाय करणाऱ्या जाधव परिवारास बसला. वखारीच्या व्यवसायात नागरिकांकडून सुट्टेच पैसे जमा होत असल्याने त्यांच्याकडे दहा रुपयांची नाणी मोठय़ा संख्येने जमा झाली.
जवळपास सहा हजार रुपयांची ही नाणी चिखलीतील एका बँकेत भरण्यासाठी ते गेले, तेव्हा सुरुवातीला बँकेच्या अधिकाऱ्यांनीच ते स्वीकारण्यास नकार दिला. बरीच हुज्जत घातल्यानंतर बँकेने पैसे स्वीकारण्याचा मार्ग पत्करला. नाण्यांची मोजदाद सुरू झाल्यानंतर रांगेतील इतर नागरिक वैतागले होते. या संदर्भात, पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर बँकेने कोणतेही भाष्य न करण्याची भूमिका घेतली.
आमची लाकडाची वखार असल्याने सुट्टे पैसे व दहा रुपयांची नाणी जमा होत होती. आम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न केला असता, नागरिक ते स्वीकारत नव्हते. त्यामुळे जमा झालेले पैसे बँकेत भरण्यासाठी गेलो. सुरुवातीला त्यांनी बरेच आढेवेढे घेतले. मात्र, नंतर ती नाणी स्वीकारली.
– सोपान जाधव, जाधववाडी, चिखली