पुणे : जी-२० परिषदेअंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या बैठकीनिमित्त शिक्षण विभागातर्फे रन फॉर एज्युकेशन रॅली मंगळवारी (२० जून) सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे. शनिवारवाडा ते महापालिका भवन या मार्गावर ही फेरी होईल. शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी प्रसिद्धिपकाद्वारे ही माहिती दिली. पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावर शिक्षण कार्यगटाचा विषय आहे.
हेही वाचा >>> पुणे: मणिपूर हिंसाचाराबाबत केंद्रीय मंत्र्यांनी बोलणे टाळले
या परिषदेतील विविध देशांतील प्रतिनिधी आले आहेत. त्यामुळे या परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी रन फॉर एज्युकेशन रॅली आयोजित करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या फेरीत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. तर पुणे महापालिकेच्या शाळा, शासकीय आश्रमशाळांतील सुमारे सातशे विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार आहेत.