राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना टीका केली. शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची ही विकृत मनोवृत्ती असल्याचं म्हणत त्यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “करोना महामारीमधून महाराष्ट्र बाहेर पडत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न असे मोठे प्रश्न राज्यासमोर आहेत. यासाठी हा महाराष्ट्र एकत्र येतो, लढतो आणि या लढाईच्या विरोधात जिंकतो देखील. महाराष्ट्राला सावरण्यासाठी विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे. या महाराष्ट्रात वाद कसा निर्माण होईल, याकडे काहींचं फार लक्ष असते. त्या लोकांचे कोणते व्हिडिओ, कोणते फोटो आहेत हे मला माझ्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे वाटत नाही.”

तसेच, “नवनीत राणा या केंद्रात प्रतिनिधित्व करतात, त्यांनी जर करोना काळात महाराष्ट्र राज्य अडचणीमध्ये होता तेव्हा असाच पुढाकार घेऊन केंद्राकडे मदतीसाठी मागणी केली असती, तर ती मागणी महाराष्ट्राच्या लोकांच्या निश्चित लक्षात राहिली असती. पण सध्या जे काही चाललं आहे ते शांत महाराष्ट्राला अशांत करायचं ही विकृत मनोवृत्ती वाटत आहे.” असं म्हणत खासदार नवनीत राणा यांना त्यांनी टोला लगावला.

याचबरोबर, “भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहे. त्यावर महिला आयोगा मार्फत कशा प्रकारे कारवाई करण्यात येत आहे? याबाबत बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “पीडित महिला गणेश नाईक यांच्या विरोधात दोन वेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारे तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यावर अखेर पीडित महिलेने महिला आयोगाकडे तक्रार करताच, संबधीत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले. त्यानुसार गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गणेश नाईक फरार झाले. या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यावर त्यांना जामीन मंजूर झाला. पण त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. त्या एकूणच प्रकरणावर महिला आयोगाच लक्ष असून निःपक्षपाती तपास होईल. पीडित महिलेने केलेल्या मागणीनुसार कारवाई होईल.”, असे वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali chakankar aims at navnat rana msr 87 svk
Show comments