Rupali Chakankar on Governor Appointed MLC : राज्यपालनियुक्त सात आमदारांचा शपथविधी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत पार पडला. विधानपरिषदेचे सात सदस्य निवडले गेले आहेत. हेमंत पाटील – शिवसेना (एकनाथ शिंदे), मनिषा कायंदे – शिवसेना (एकनाथ शिंदे), पंकज भुजबळ – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), महंत बाबूसिंग महाराज – बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा), विक्रांत पाटील (भाजपा), चित्रा वाघ (भाजपा) हे सात नेते आता विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. दरम्यान, विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) रुपाली चाकणकर देखील प्रयत्न करत होत्या, मात्र त्यांना यावेळी संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, चाकणकरांना यावेळी पक्षाने संधी का दिली नाही, तसेच पुन्हा संधी मिळेल का? आणि पक्षावरील नाराजीबाबत भाष्य केलं आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. पुणे शहरातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत त्यांनी आढावा घेतला असून यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, एकूण सात जागा होत्या. त्यापैकी दोन जागा आमच्या वाट्याला आल्या. आमच्या वाट्याला तीन जागा आल्या असत्या तर महिला म्हणून मला आमदारकी मिळाली असती. परंतु, दोनच जागा आम्हाला मिळाल्या. पुढच्या वेळी माझा विचार केला जाईल. मला विधान परिषदेचं सदस्यत्व मिळावं अशी माझी अपेक्षा होती. मी मागणी देखील केली होती. परंतु, यावेळी संधी मिळाली नाही. पुढच्या वेळी मला नक्की संधी मिळेल. तसेच, महायुती सरकारचं मी आभार मानते, त्यांनी मला परत एकदा महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं आहे.
हे ही वाचा >> Pimpri Assembly Constituency : पिंपरीकर कोणाला कौल देणार, मविआ की महायुती? कसं आहे विधानसभेचं गणित?
निवडणुकीनंतर संधी मिळणार?
चाकणकर म्हणाल्या, आमच्याकडे राज्यपालनियुक्त तीन जागांसाठी ७२ अर्ज आले होते, पक्षाला निर्णय घेणं अवघड होतं, निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता येणार आहे. मग राहिलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागांवर सत्ता आल्यानंतर नियुक्त्या केल्या जातील. त्यावेळी इतरांना संधी मिळेल.
हे ही वाचा >> Chinchwad Assembly Constituency : चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार; भाजपाच्या गडाला मविआ सुरुंग लावणार का? कसं आहे राजकीय गणित?
खडकवासला मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळणार? चाकणकर म्हणाल्या…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या, २०१९ मध्ये मी तशी मागणी केली होती. खडकवासला मतदारसंघाची निवडणूक लढवणार म्हणून मी तिकडे काम करत होते. आता महायुती म्हणून आम्ही ज्येष्ठ पदाधिकारी अजित पवार यांच्याकडे खडकवासल्याच्या जागेची पुन्हा एकदा मागणी केली आहे. पण महायुतीत ती जागा भाजपाकडे आहे, आम्ही महायुतीचा धर्म पाळू आणि काम करू.