छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली पाटील ठोंबर यांनी केतकी चितळेला चोप देणार असल्याचे म्हटले आहे.
“केतकी चितळे तिच्या आजोबांच्या वयाच्या माणसाबाबत अशी भाषा वापरत आहे. ही मनोरुग्ण अभिनेत्री आहे. जातीजातीमध्ये तेढ वाढण्याचे पोरखेळ त्वरित बंद झाले पाहिजेत. केतकी चितळे आजारी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिच्या आईवडिलांचे दुर्दैव म्हणावे लागेल की त्यांनी तिला संस्कार दिलेले नाहीत. त्या पोस्टखाली अॅड. नितीन भावे असे लिहिले आहे. मला नाही वाटत कोणी नितीन भावे असतील. केतकीने जो खोडसाळपणा केला आहे त्यानंतर आता तिला तिच्याच भाषेत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून चोप देण्यात येणार आहे,” असे रुपाली पाटील म्हणाल्या.
“शरद पवारांविषयी बोलण्याची तिची पात्रता नाही आणि जे काही बोलली आहे त्याला कुठलाही अर्थ नाही. आमच्या सारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून तिला चार पाच चापटी मिळाल्या ना तर ती आजारातून लवकर बरी होईल. तिचा नंबर फेसबुकवर टाकून आम्ही ती ज्या भाषेत बोलली आहे त्याच्या खालच्या भाषेत कमेंन्ट करण्यास सांगणार आहोत,” असेही रुपाली पाटील म्हणाल्या.
“याच्यामध्ये बदनामी केली म्हणून ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल करून असे विकृत जागेवर येत नसतात, आणि केतकी सारखे तर नाहीच नाही. मध्यंतरी तिच्याविरोधात बोलणाऱ्या ट्रोलर्सवरुन आम्ही भाष्य केले होते. मात्र तिने आता कळसच गाठला आहे. छडी वाजे छम छम या उक्ती प्रमाणे तिला छड्या दिल्या की, ती जागेवर येईल आणि तिचे संस्कारही जागेवर येतील,” असेही रुपाली पाटील म्हणाल्या.