योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे विधान बाबा रामदेव यांनी केलं. या विधानानंतर बाबा रामदेव यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली-पाटील ठोंबरे संतापल्या आहेत.
“बाबा रामदेव यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करते. बाबा रामदेव यांनी आता डोक खाली आणि पाय वर करून शिरशासन करावे. अर्धा तास नाहीतर चार तास करा, म्हणजे तुमच्या मेंदुला रक्ताचा पुरवठा होईल. त्यानंतर महिलांचा अपमान करणारी अशी बेताल वक्तव्य तुम्ही करणार नाही. पुण्यात आल्यावर बाबा रामदेव यांना काळं फासणार,” असा इशाराही रुपाली पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा : “…अन्यथा रट्टे देईन”, संतोष बांगर यांची पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला दमदाटी
“बाबा रामदेव यांनी हे विधान अमृता फडणवीस यांच्यासमोर केलं आहे. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देताना अमृता फडणवीस एकदम गुळगुळीत उत्तर देत, मी वक्तव्य ऐकलं नाही, त्यांचा बोलण्याचा असा उद्देश नव्हता म्हणतील. पण, तेव्हा अमृता फडणवीस यांनी बाबा रामदेव यांच्या सणकन कानाखाली ओढली पाहिजे होती,” असेही रुपाली पाटील यांनी म्हटलं. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
हेही वाचा : “अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”, बाबा रामदेव यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
काय आहे विषय?
ठाण्यात हायलँड मैदानात योग गुरु रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. तेव्हा खासदार श्रीकांत शिंदे, अमृता फडणवीस, आमदार रवी राणा उपस्थित होते. महिलांना संबोधित करताना बाबा रामदेव यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ‘महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात,’ असं बाबा रामदेव म्हणाले.