मनसेतून राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्या. “रुपाली ताईंना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक त्यांना मानतात. त्यांच्यामुळे पुणे शहर पुढे जाईल, महिलांचा विकास होईल,” असं अजित पवार यावेळी म्हणाले. रुपाली ठोंबरे आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं अजित पवारांनी राष्ट्रवादीत स्वागत केलं.
मी ज्या पद्धतीने आधी लोकांसाठी काम करत होते, त्याच पद्धतीने मी राष्ट्रवादीत आल्यानंतरही लोकांसाठी काम करने, असा शब्द यावेळी रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला. अजित पवारांनी दिलेल्या हिमतीमुळे मला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली, असं त्यांनी सांगितलं. “मनसेत असताना सतत पालकमंत्री अजित पवारांची भेट का घेते, अशी विचारणा व्हायची. पालकमंत्री म्हणून अजित पवार खूप चांगलं काम करत आहेत. मी ज्या कामांसाठी आतापर्यंत अजित पवारांची भेट घेतली, ती सर्व कामे त्यांनी कायदेशीररित्या पूर्ण केली,” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.माझ्याच पूर्वीच्या पक्षातील काही लोकांना मला राष्ट्रवादीत पाठवायचे होते, असं रुपाली ठोंबरे यांनी यावेळी सांगितलं.