रिझव्र्ह बँकेने घातलेल्या र्निबधांमुळे रुपी को-ऑप. बँकेच्या असंख्य खातेदारांच्या मनात अनेक शंका असल्याचे आणि त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी झाल्याचे वातावरण बँकेच्या विविध शाखांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळेच खातेदारांच्या संतप्त सवालांना उत्तरे देता देता पुरेवाट झाली. दरम्यान, दिवसभरात साडेतीन हजार खातेदारांनी बँकेतून किमान ३५ लाख रुपयांची रक्कम काढल्याचा अंदाज अध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांनी व्यक्त केला.
थकीत कर्जाची वसुली करण्यामध्ये अनियमितता असल्यामुळे रिझव्र्ह बँकेने रुपी को-ऑप. बँकेवर शनिवारपासून आर्थिक र्निबध घातले. या र्निबधांनुसार खातेदाराला आता सहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये काढता येणार आहेत. त्यामुळे निवृत्तिवेतनावरच अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तीवरील उपचारासाठी त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागला. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीच विविध शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी खातेदारांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना त्यांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. पेन्शनच्या रकमेवरच आमची गुजराण होत असल्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न निवृत्तिवेतनधारक ज्येष्ठ नागरिकांना पडला होता. तर, आजारी व्यक्तीवर उपचार करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी खात्यामध्ये पैसै असूनही केवळ एक हजार रुपयेच मिळणार असल्यामुळे अनेकांची चिडचीड झाली होती. केवळ एक हजार रुपयांमध्ये सहा महिने कसे भागणार अशीच त्यांना चिंता होती. एक हजार रुपयेच मिळणार असतील तर ते तरी कशाला काढायचे, या भूमिकेतून अनेक खातेदार बँकेकडे फिरकलेच नाहीत.
रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी संचालक कुरुप्प स्वामी हे मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पुण्यामध्ये येत आहेत. त्यांची भेट घेऊन बँकेच्या स्थितीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न असून रिझव्र्ह बँकेच्या र्निबधांतून पेन्शनर, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थी खातेदारांना सूट देण्यात यावी, अशी मागणी बँकेच्या संचालक मंडळातर्फे रिझव्र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि सहकार आयुक्तांना करण्यात येणार असल्याचे प्यारेलाल चौधरी यांनी सांगितले.

Story img Loader