लोणावळा : लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.लोणावळा शहरातील हॉटेल युटोपिया, हाॅटेल कुमार रिसॉर्ट, तसेच ग्रामीण भागातील हॉटेल बैठक येथे बेकायदा हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली असून, बंदी आदेश झुगारून बेकायदा हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी हाॅटेलमधील ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने हुक्का ओढण्यासाठी लागणारे पात्र, सुगंधी तंबाखू, तसेच अन्य साहित्य असा ९३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी रुस्तम वकील अहमद (वय २०), रोशन मनोज यादव (वय ३०), कृष्णा नाथ राठोड (वय ३१, तिघे रा. लोणावळा), प्रताप कृष्णा डिंबळे (वय ४२ ,रा. कार्ला), बिपीन परमेश्वर महातो (वय ३०, रा. उल्हासनगर, ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम चव्हाण, रोहन पाटील, अंकुश नायकुडे, सचिन गायकवाड, सुभाष शिंदे, अंकुश पवार, गणेश येळवंडे यांनी ही कारवाई केली.