पती-पत्नीत होणारे किरकोळ वाद आणि कुरबुरीचे रुपांतर अनेकदा कडाक्याच्या भांडणात होते. अनेकदा हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात किंवा अनेक प्रकरणे अगदी घटस्फोटापर्यंतही जातात. किरकोळ कुरबुरीतून पती-पत्नीची दुरावलेली मने जोडण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे आणि ग्रामीण पोलिसांतर्फे लवकरच ‘नांदा सौख्यभरे’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षातर्फे या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सरत्या वर्षांत ग्रामीण पोलिसांच्या महिला साहाय्यता कक्षाकडे आलेल्या अनेक तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या तक्रारी सोडवताना पती-पत्नीच्या संसारात त्यांच्या नातेवाइकांकडून होणारा हस्तक्षेप हा त्यांच्यातील विसंवादाला कारणीभूत ठरत असल्याचे बऱ्याच प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. तसे पोलिसांचे निरीक्षण आहे. अशा तक्रारींपैकी काही तक्रारींचे निराकरण पोलीस ठाण्याच्या पातळीवर करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर तक्रार घेऊन आलेले दाम्पत्य निराकरण झाल्यावर एकमेकांशी नीट वागते का नाही, याचीही पडताळणी पोलीस करत आहेत.
पती-पत्नीमधील वादाचे मूळ शोधून दोन्ही बाजूंकडील नातेवाइकांना पोलिसांकडून मार्गदर्शन केले जात आहे. ग्रामीण भागातील महिला दक्षता समिती आणि पोलीस अधिकारी दर पंधरवडय़ाने त्याचा आढावा घेतात. ज्या दाम्पत्याला पाषाण येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात येणे शक्य नसते, त्यांच्या तक्रारी  ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांच्या पातळीवर सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला साहाय्य कक्षाकडे समुपदेशनासाठी आलेल्या आणि नंतर आनंदाने संसार करत असलेल्या दाम्पत्यांचा सत्कारही ‘नांदा सौख्यभरे’ या उपक्रमाच्या उद्घाटनात केला जाणार आहे.

नवदाम्पत्यांमध्ये वाद वाढले
ग्रामीण पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षात तक्रारी घेऊन येणारे पन्नास टक्के तक्राददार हे नवविवाहित असतात. त्यांच्यात छोटय़ा गोष्टींवरून वाद होतात. सामोपचाराने घरातच वाद मिटवण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येत नाही. त्यामुळे ही प्रकरणे पोलिसांकडे जातात. अशा अनेक प्रकरणांमध्ये उभयतांमधील वाद पोलिसांनी मिटवले आहेत.