शहरात सोमवारी ढगफुटीसदृश पडलेल्या पावसामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दुचाकीच्या दुरुस्तीच्या खर्चाचा भुर्दंड दुचाकीधारकांनाच सहन करावा लागला, तर मोटारीच्या नुकसान भरपाईसाठी आता धावाधाव सुरू झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे : राजकारण्यांचे मतदार प्रेम दिवाळीमुळे उफाळले ; दिवाळी मतदार आणि राजकीय नेते मंडळींच्या पथ्यावर

परतीच्या पावसाने सोमवारी शहराला झोडपले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही जोरदार पाऊस झाला. शहरातील चौकांमध्ये पाणी साचले, रस्त्यांवरून पाणी वाहू लागले, सोसायट्यांच्या तळघरात पाणी घुसले. त्यामुळे तळघरात लावलेल्या वाहनांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडले. अनेक ठिकाणी पाण्यात अडकलेली वाहने ओढून काढावी लागली. वाहनांमध्ये पाणी जाऊन बंद पडलेल्या वाहनांच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी गॅरेजमध्ये गर्दी झाली होती. त्यातही दुचाकींचे प्रमाण अधिक होते. तर मोटारींच्या झालेल्या नुकसानासाठी आता वाहनविम्याअंतर्गत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यासाठी मोटारमालकांची धावाधाव सुरू झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे : पावसामुळे वाहनांमध्ये बिघाड, दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गर्दी

खराडी येथील रहिवासी अनिकेत वाणी म्हणाले, की सोमवारी झालेल्या पावसामुळे आमच्या परिसरात कंबरभर पाणी साचले होते. त्यामुळे माझ्या चारचाकीचे नुकसान झाले. चारचाकीचा खासगी विमा कंपनीचा विमा आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे दावा दाखल केला आहे.
माझ्या दुचाकीत पाणी जाऊन बिघाड झाला होता. मात्र विमा प्रतिनिधीकडे चौकशी केल्यावर पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दुचाकीसाठी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमच्या कुटुंबातील तीन दुचाकी प्रत्येकी दोन हजार रुपये खर्च करून दुरुस्त करून घ्याव्या लागल्या, असे नारायण पेठेतील रहिवासी प्रणव पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीत वीजकपातीची स्थिती कायम ; चार नव्या विद्युत उपकेंद्रांसाठी कार्यवाही- उदय सामंत

पाण्यात अडकलेले वाहन सुरू न करता शोरूमला नेल्यासच विम्याचा दावा मान्य होतो. गाडी सुरू केल्यास इंजिन लॉक होत असल्याने विमा कंपन्यांकडून दावा मान्य केला जात नाही. २०१९मध्ये आंबिल ओढा फुटून पूर आला होता, त्या वेळी अपवादात्मक परिस्थिती म्हणून मोठ्या प्रमाणात वाहन विमा दावे मान्य करण्यात आले होते. मात्र सोमवारी झालेल्या पावसातील वाहनांच्या नुकसानीचे दावे मान्य केले जातील का, याबाबत स्पष्टता नाही. कोणत्याही वाहनाचा थर्ट पार्टी विमा असल्यास कोणताही दावा मान्य होत नाही, असे विमा प्रतिनिधी मंदार पानसे यांनी सांगितले.

सोमवारी झालेल्या पावसानंतर वाहन विम्याचे दावे दाखल होऊ लागले आहेत. आता नियमानुसार आवश्यक ती प्रक्रिया करून दाव्यांची पू्र्तता केली जाईल.- रुद्राशिष रॉय, उपमहाव्यवस्थापक, द न्यू इंडिया ॲश्युरन्स