पुणे : दिवाळीतील कपडे, सजावट साहित्याच्या खरेदीसाठी शनिवारी मध्यभागात गर्दी झाली. शहर तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी ररस्ता परिसरात खरेदीसाठी आले होते. खरेदीच्या गर्दीमुळे मध्यभागातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत झाली. दिवाळीचा प्रारंभ येत्या शुक्रवारपासून (२१ ऑक्टोबर) होत आहे. शुक्रवारी वसूबारस आहे.
हेही वाचा >>> विद्यापीठ शुल्कवाढ विरोधातील आंदोलन स्थगित
शनिवारी (२२ ऑक्टोबर) धनत्रयाेदशी आहे. सोमवारी (२४ ऑक्टोबर) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे बाजारात दिवाळी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शनिवारी (१५ ऑक्टोबर) आणि रविवारी (१६ ऑक्टोबर) सुट्टी आल्याने पुणे शहर, उपनगरातील नागरिकांनी सहकुटुंब मध्यभागातील व्यापारी पेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. खरेदीसाठी गर्दी झाल्याने बाजारपेठेत उत्साह जाणवत होता. मंडई, शनिपार परिसरात आकाशकंदील, सजावट साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुकाने थाटली आहेत.
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील वस्त्रदालनात शनिवारी सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवार पेठेतील कापडगंज, बोहरी आळी परिसरात सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली. बुधवार पेठेतील पासाेड्या विठोबा चौक ते मोती चौक परिसरातील विद्युत रोषणाईचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकाने उजळून निघाली होती. मोती चौक परिसरात उटणे, उदबत्ती खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शनिपार, मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेक रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी गर्दीतून वाट काढत खरेदी केली.
पावसामुळे दुपारी खरेदी
शहरात शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी मुसळधार पाऊस झाला. पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सकाळपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने मध्यभागात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मोटारी, दुचाकी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यात आली. त्यामुळे कोंडीत भर पडली.