स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टिळक रस्त्यावरील शाखेच्या कार्यालयाला बुधवारी पहाटे आग लागून संपूर्ण कार्यालय खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे रोकड व महत्त्वाची काही कागदपत्रे वाचविण्यात यश आले. मात्र, बँकेचे तीस संगणक व फर्निचरही जळाले. या आगीमध्ये ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बँकेतील पैसे, लॉकरमधील मौल्यवान वस्तू सुरक्षित असून खातेदारांनी घाबरू नये, असे आवाहन बँकेच्या व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.
हिराबाग चौकातील महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यालय आहे. पहाटे पावणेपाचच्या सुमारास टिळक रस्त्यावर वाहतुकीचे पट्टे आखण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला बँकेच्या कार्यालयातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षला घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी बँकेचे शटरचे कुलूप तोडले. बँकेच्या काचा फोडून कोंडलेला धूर बाहेर जाण्यास वाट मोकळी करून दिली. पाण्याचा मारा करून अध्र्या तासात आग आटोक्यात आणली. बँकेच्या कपाटात असलेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांना झळ पोहोचली नाही. एका तासात पूर्णपणे आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये साधारण तीस संगणक, खुच्च्र्या जळून गेल्या. मात्र, स्ट्राँगरूममधील रोकडला काहीही झाले नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली. या कारवाईत सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, केंद्र प्रमुख सुनिल गिलबिले, राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीस ते पस्तीस जवानांनी सहभाग घेतला. या आगीमागे घातपाताची शक्यता नसून याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाय. जी. कदम करत आहेत.
 
खातेदारांनी घाबरू नये- उपमहाव्यवस्थापक
टिळक रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयास आग लागल्याची माहिती समजताच खातेदारांनी आज सकाळी बँकेसमोर गर्दी केली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपमहाव्यवस्थापक महानंदा मल्याळमठ म्हणाल्या की, या आगीची झळ स्ट्राँगरुमला बसलेली नाही. महत्त्वाची कागदपत्रे, रोकड, चीजवस्तू सुरक्षित आहेत. खातेदारांनी घाबरू नये. टिळक रस्ता शाखेचे व्यवहार दोन ते तीन दिवसात सुरळीत होतील. सध्या बँकेचे कामकाज मुख्य शाखेतून केले जाईल.