स्वारगेटच्या एसटी स्थानकातून बस पळवून नेऊन शहराच्या रस्त्यावर नऊ जणांचा बळी घेणाऱ्या आणि ३७ जणांना जखमी करणाऱया एसटी चालक संतोष माने याला बुधवारी न्यायालयाने खून, खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरविले. त्याला येत्या आठ एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी हा निर्णय दिला.
मानेवर भारतीय दंडविधान संहितेतील ३०२ खून करणे, ३०७ खुनाचा प्रयत्न करणे, ३८१ चोरी करणे, ३२४ इजा पोहोचविणे आणि ४२७ सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी कलमे लावण्यात आली होती. ती सर्व सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
माने याने मागील वर्षी २५ जानेवारीला सकाळी स्वारगेट स्थानकातून एसटीची एक बस बाहेर काढली. शहरातील सेव्हन लव्हजपासून ते सारसबागेपर्यंत विविध रस्त्यांवर बेदरकारपणे गाडी चालवित त्याने नऊ जणांचा बळी घेतला, तर ३७ जणांना जखमी केले. या प्रकरणाने शहरातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. सारसबागेजवळ पोलिसांनी आणि नागरिकांनी मानेला अटक केली होती.
माने हा १९ फेब्रुवारी २०१० ते ३ नोव्हेंबर २०११ या काळात मानसिक उपचार घेत होता. या काळात त्याला सहा शॉक दिण्यात आले, असी साक्ष सोलापूर येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दिलीप बुरटे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली होती. मात्र, माने मानसिक रुग्ण असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. 

Story img Loader