पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी ठाकरे गटाकडून कलाटे यांची मनधरणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी आज राहुल कलाटे यांची भेट घेतली.
हेही वाचा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…
काय म्हणाले सचिन अहीर?
या भेटींनंतर सचिन अहीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मी राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. ‘राहुल कलाटे यांनी निवडणुकीत माघार घ्यावी, भविष्यात महाविकास आघाडीकडून त्यांना राजकीय मदत केली जाईल’, उद्धव ठाकरेंचा हा निरोप आम्ही त्यांना दिला. तसेच त्यांचं आज उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणं झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह ग्राह्य धरून त्यांनी या निवडणूक माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याची प्रतिक्रिया सचिन अहीर यांनी दिली.
राहुल कलाटे माघार घेणार?
याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नसून कार्यकत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू, असं कलाटे यांनी सांगितलं असल्याचंही अहीर म्हणाले. तसेच राहुल कलाटे हे नक्कीच माघार घेतील आणि महाविकास आघाडीबरोबर राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“मी निवडणूक लढण्यावर ठाम”
सोमवारी यासंदर्भात बोलताना, मी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया राहुल कलाटे यांनी दिली होती. “मी २०१९ ला चिंचवड विधानसभा लढलेलो आहे. तेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा कोणी विचार केला नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या समोर मी लढलो. त्यावेळी नागरिकांनी भरभरून प्रेम दिले. पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध दिल्यास मीही विचार करेल. काही दिवसांपूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक होईल, असे वाटत होते. तेव्हा ‘मी वेट अँड वॉच’च्या भूमिकेत होतो. परंतु, निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी पुढे आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचे ठरवले”, असे ते म्हणाले. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून राहुल कलाटे माघार घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.