पुणे : जिल्ह्यात एक जागा तर ताकद असलेल्या ठिकाणी दोन जागा पक्षश्रेष्ठीकडे मागणार असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. ते आज पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये विधानसभेच्या जागेवरून सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला खोचक टोला लगावला आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, संजोग वाघेरे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुण्यात सहा विधानसभेवर दावा केला आहे. खासदार निवडून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभं राहिलं होतो. पुढे ते म्हणाले, तुम्ही सांगा, कुठली जागा सोडणार म्हणजे आम्ही मागणी करत नाहीत. असा खोचक टोला अहिर यांनी शरद पवार गटाला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, पिंपरीत आमची ताकद आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभेची मागणी करण्यात आली आहे. अखेर वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहोत.
आणखी वाचा-शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आता पुन्हा सुधारित धोरण… होणार काय?
पुढे ते म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण करण्याच काम हे सरकार करत आहे. मराठा आरक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलं होतं. ओबीसी बांधवांना देखील यांनी आश्वासन दिले आहे. पुढे ते म्हणाले, कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सरकार जबाबदार असेल.