चित्रपटांमधील कलाविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते दाखवले जाते, अशी खंत अभिनेते सचिन खेडेकर यांनी निगडीत व्यक्त केली. करमणुकीचा दर्जा खालावला असताना प्रेक्षकांची करमणुकीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी कलावंतांनी आणखी चांगले काम केले पाहिजे. समाज बदलण्याच्या प्रक्रियेत कलावंत आणि प्रेक्षक अशा दोघांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
प्राधिकरणातील दुर्गेश्वर आणि श्री समर्थ मंडळाच्या वतीने मिलिंद कुलकर्णी यांनी खेडेकरांची प्रकट मुलाखत घेतली. दिलखुलास गप्पा मारतानाच खेडेकरांनी आवडत्या कवितांचे सादरीकरणही केले. डॉ. कल्याण गंगवाल, राहुल कलाटे, आर. एस. कुमार व आयोजक अमित गावडे उपस्थित होते.
खेडेकर म्हणाले, नट होण्यापूर्वी उत्तम विद्यार्थी होतो. शिक्षण पूर्ण करून हवे ते कर, अशी पालकांची भूमिका होती. अभिनयाची हौस होती, त्याचे रूपांतर करीअरमध्ये झाले. नाटकांमध्ये चांगले गुरू मिळाले. त्यांनी उत्तम माणूस हो, असा गुरुमंत्र दिला, तो आयुष्यभर पुरला. रसिकांच्या प्रेमामुळेच इतके काम करता आले, त्यातून तुटपुंजे यश मिळाले. नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये केलेली सगळी कामे चांगली होती, असे म्हणणार नाही. मात्र, निवडक कामे चांगली व लक्षात राहण्यासारखी करण्याचा प्रयत्न केला. १०० पैकी १० भूमिका आयुष्यभर टिकून राहतील, अशा झाल्या आहेत. विविधांगी भूमिका साकारताना अनेक आयुष्य जगलो, हे माझे संचित आहे. विविध भूमिकांमुळे मी सुसंस्कृत झालो. नट नेहमी दुय्यम असतो, त्याचे योगदान अवघे १० टक्के असते. नटांची नक्कल केली जाते, त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढते. कलावंतांनी स्वत:शी प्रामाणिक असले पाहिजे. टीव्हीमुळे वाचन कमी झाले आहे. भाषा टिकवण्याची गरज असून ते काम अवघड झाले आहे.
कलाविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते दाखवले जाते – सचिन खेडेकर
करमणुकीचा दर्जा खालावला असताना प्रेक्षकांची करमणुकीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी कलावंतांनी आणखी चांगले काम केले पाहिजे.
आणखी वाचा
First published on: 24-08-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin khedekar movies entertainment