पुणे : राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे शिक्षण आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, सिंह यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची क्रीडा आयुक्तपदी बदली करून शिक्षण आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सचिंद्र प्रताप सिंह यांची नुकतीच शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार सिंह यांनी गुरुवारी कार्यभार स्वीकारला. सिंह या पूर्वी दिव्यांग कल्याण विभागात सचिवपदी कार्यरत होते.
राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने विभागातील कामकाजाची माहिती घेऊन पुढील कामाची दिशा ठरवणार असल्याची भावना सिंह यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.