पुणे : पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्यात आली आहे. ओमप्रकाश बकोरिया यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले असून सचिंद्र प्रताप सिंह यांनी पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार गुरुवारी स्वीकारला.
पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओप्रकाश बकोरिया यांची गेल्या नऊ महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीच्या कारभाराला गती देण्याचा प्रयत्न बकोरिया यांनी केला. नवीन बस खरेदी धोरणांतर्गत पीएमपीच्या स्वमालकीच्या गाड्या खरेदीला त्यांनी प्राधान्य दिले. पीएमपीच्या सर्वाधिक गाड्या त्यांनी संचलनात आणल्या. याशिवाय मार्गांचे सुसूत्रीकरण करताना सातव्या वेतन आयोगाची अंमलबाजवणी, ठेकेदारांना शिस्त, कर्मचारी पदोन्नती, भरती प्रक्रिया त्यांनी तातडीने राबविली होती.
हेही वाचा… पुण्यातील काँग्रेसला उशिरा का होईना आली जाग… आता दर सोमवारी बैठक
हेही वाचा… पुणे : पोलीस कर्मचार्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या
दरम्यान, सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरुवारी सायंकाळी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी त्यांना पदभार दिला. सचिंद्र प्रताप सिंह यापूर्वी पशुसंवर्धन विभागात आयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची या पदावरून बदली करण्यात आली होती. मात्र, नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. पीएमपीचा संचलन तोटा कमी करण्याचे आव्हान सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे असणार आहे.