पुणे : “रोहित पवार हे महान नेते आहेत. महान नेत्यांच्या बाबतीत शेतकर्यांच्या मुलांनी काय बोलावे. त्यांच्याच सरकाराच्या काळात एवढे चांगले निर्णय घेतले की, विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो असून हे सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेईल. तसेच रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत”, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली.
राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांकडून साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार आणि सदाभाऊ खोत हे देखील सहभागी झाले होते.
भाजप नेते प्रसिद्धीकरीत आंदोलनात सहभागी झाले आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी सदर प्रतिक्रिया दिली. खोत पुढे म्हणाले की, या आंदोलनात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी सहभागी झाले असून, ते उद्याचे अधिकारी आहेत. या सर्व स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी वर्गामागे हे सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या बाजूनेच निर्णय घेतील, अशी भूमिका खोत यांनी मांडली.
स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय होईल. तसेच, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतील. त्याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी कुठला विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला आणि तो मान्य होणार नाही, असे कधी होत नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आम्ही देखील येथून उठणार नाही, अशी भूमिका आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडली.
आम्ही काही घर कोंबडे नाहीत : गोपीचंद पडळकर
हे आंदोलन कुठल्याही पक्षाचे नसून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा हीच आमची भावना आहे. आम्ही एकदा कोणत्याही आंदोलनात लक्ष घातले की, आम्ही ते पूर्ण करतो. आम्ही काही घर कोंबडे नाहीत, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच, देवेंद्र फडणवीस हे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करतील, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलनात सहभागी असणार, असेही जाहीर केले.