प्रजासत्ताक दिन म्हणजे ध्वजवंदनाबरोबरच प्रभातफेऱ्या, रक्तदान शिबिरे, खाऊ वाटप अशा उपक्रमांचा दिवस! पण प्रजेच्या अडचणी राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिवसाचे निमित्त साधण्याचे एका संस्थेने ठरवले आहे. नागरिकांच्या रोजच्या जगण्यातल्या ज्या-ज्या गोष्टींमध्ये शासनाचा संबंध आहे अशा गोष्टींबाबतच्या तक्रारी करण्यासाठी नागरिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. घराच्या गल्लीतला रस्ता खराब आहे अशा स्थानिक पातळीवरील प्रश्नापासून एखाद्या सरकारी खात्याशी संबंधित काम करून घेताना प्रचंड विलंब लागतो अशा अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ काम करणार आहे.
‘सदाचार साधना’ या संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला जाणार आहे. नागरिकांनी २० जानेवारीपर्यंत संस्थेकडे आपल्या अडचणी लेखी स्वरूपात कळवायच्या आणि संस्था या अडचणींची यादी संबंधित सरकारी खात्याकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार अशी ही संकल्पना आहे. विशेष म्हणजे नागरिक आपले नाव समोर येऊ न देता निनावी पत्राच्या स्वरूपातही अडचण पाठवू शकणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष अविनाश दरवडे म्हणाले, ‘‘एकेकटय़ा नागरिकाने शासनाकडे अडचण सांगण्यापेक्षा त्या संस्थेच्या माध्यमातून मांडल्या गेल्यास त्याला बळ मिळेल. प्रजासत्ताक दिनाला याची सुरुवात होत असली तरी आम्ही पुढे दर महिन्याला नागरिकांकडून तक्रारी मागवणार आहोत. शिवाय एकदा तक्रार शासनाकडे सोपवल्यावर दर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात त्या-त्या तक्रारीवर किंवा मागणीवर कार्यवाही झाली का याचा आढावा घेणार आहोत.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा