साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाचा पुरस्कार सरकारने रद्द केल्यानंतर सुरू झालेल्या वादावर आपली भूमिका मांडली. “ज्यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाची शिफारस केली, त्यांनीच सरकारला पत्र लिहून पुरस्काराला विरोध केला,” असा मोठा दावा सदानंद मोरे यांनी केला. तसेच याबाबत आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं. ते बुधवारी (१४ डिसेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सदानंद मोरे म्हणाले, “कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकावर आक्षेप घेणारे नरेंद्र पाठक होते. ज्यांनी पहिल्या फेरीत छाननी करून हे पुस्तक योग्य आहे, विचार करायला हरकत नाही असं सांगितलं, शिफारस केली. तो आमचा पाया आहे. पुरस्कारांची सर्व इमारत नरेंद्र पाठक यांच्या शिफारशींच्या पायावरच उभी आहे. आता तो पायाच मी तो पाया काढून घेतो असं म्हणत आहे.”
“ज्यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाची शिफारस केली, त्यांनीच पुरस्काराला विरोध केला”
“मला आश्चर्य वाटतं की, ज्यांनी पुस्तकाची शिफारस केली तेच सरकारला पत्र लिहून आक्षेप घेत आहेत. नरेंद्र पाठक अखिल भारतीय साहित्य परिषद नावाच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी सरकारला पत्र लिहून सांगितलं, ‘अखिल भारतीय साहित्य परिषद या निवडीचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. या पुस्तकाला पुरस्कार देण्याची शिफारस करणाऱ्या समितीचा हेतुही संशयास्पद वाटतो.’ म्हणजे संशयाला सुरुवात यांच्यापासूनच झाली असं म्हणावं लागेल,” असं सदानंद मोरे यांनी सांगितलं.
व्हिडीओ पाहा :
“यात साहित्य संस्कृती मंडळाची काहीही चूक नाही”
सदानंद मोरे पुढे म्हणाले, “पत्रात नरेंद्र पाठक यांनी असंही म्हटलं की, त्यामुळे ही पुरस्कार समिती बरखास्त करून तातडीने नवी समिती गठीत करावी. तसेच कोबाड गांधी यांच्या पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कर रद्द करावा आणि शासनाने पुरस्कार समितीच्या लोकांवर कारवाई करावी.”
हेही वाचा : “आता यांनी कहर केलाय” म्हणत अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…!
“हा मुद्दा सर्वांसमोर आला पाहिजे. हे पाहिलं तर यात साहित्य संस्कृती मंडळाची, मंडळाच्या अध्यक्षांची काहीही चूक नाही. हे सर्व नरेंद्र पाठक यांच्या पायावर उभं आहे. त्यांनीच तक्रार केली,” असंही सदानंद मोरेंनी नमूद केलं.