घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाला. संत नामदेवांच्या कर्मभूमीत एप्रिलमध्ये हे संमेलन होणार आहे.
डॉ. सदानंद मोरे यांच्यासाठी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेणारे ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोरे यांचे नाव सुचविले आहे. या अर्जावर पद्मगंधा प्रकाशनचे अरूण जाखडे, कवी उद्धव कानडे, सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेच्या सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि निकिता मोघे यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांच्याकडे सुपूर्द केला. अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले,की संत नामदेवांनी पंजाबमध्ये जाताना तेथे मराठी माणसे आहेत का याचा विचार केला नव्हता. मग, या संमेलनाच्या वेळेसच तेथे मराठी माणसे आहेत का हा मुद्दा उपस्थित करणे योग्य होणार नाही. मराठीबाबतची भूमिका तेथे मांडता येईल हा भाग महत्त्वाचा आहे. मी जसा संतसाहित्याचा अभ्यासक आहे तसाच आधुनिक साहित्याचाही अभ्यासक आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या,‘‘ यंदाच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैचारिक पातळी राखली जाईल अशी अपेक्षा आहे. प्रादेशिकतेच्या सीमा ओलांडून साहित्य संमेलन व्यापक होत आहे. सशक्त वातावरणात ही निवडणूक होईल अशी आशा आहे.’’

Story img Loader