पुढील वर्षी पंजाबमधील घुमानमध्ये होणाऱया ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी उमेदवारी जाहीर केली. मोरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावून त्यामध्ये अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाला मिळाले, हे १० डिसेंबर रोजी जाहीर होईल. अध्यक्षपदासाठी साहित्य महामंडळाकडे नावे सुचविण्याची २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत असून, निवडणूक झालीच तर १० डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. नियोजित अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याची ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. त्याचदिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सदानंद मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे वंशज आहेत. गेली अनेक वर्षे ते संत साहित्यावर नियमितपणे लिखाण करीत आहेत. ३ ते ५ एप्रिल दरम्यान हे संमेलन घुमानमध्ये होणार आहे. पंजाबमध्ये मराठी साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मोरे म्हणाले, कोणत्याही समस्येवर उपाय शोधताना मूळाकडे वळावे लागते, अशी माझी भूमिका आहे. संतांचे आणि आपले परंपरेचे आणि आधुनिकतेचे काय नाते आहे, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न मी गेली ४५ वर्षे सातत्याने लेखन आणि भाषणातून करतो आहे. त्याबद्दल मला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. त्याबद्दल मी ऋणी आहे.  साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी केलेल्या कामावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader