पुणे : क्वीन्स गार्डन परिसरातील साधू वासवानी पुलाच्या पाडकामाला महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. जुना पूल पाडून नव्या पुलाची उभारणी करण्यात येणार असल्याने पन्नास वर्षांपूर्वीचा हा पूल इतिहासजमा झाला आहे. नव्या पुलामुळे कोरेगाव परिसरातील वाहतुकीची कोंडी सुटण्याची शक्यता आहे.
कोरेगाव पार्क परिसरात या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. महापालिकेच्या स्थायी समितीने मार्च २०१८ मध्ये शहरातील जुन्या पुलांचे, रेल्वे उड्डाणपुलांचे तांत्रिक लेखापरीक्षण आणि तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये साधू वासवानी पूल धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाले होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तसा अहवाल महापालिकेला दिला होता. मात्र, पुलाची डागडुजी करायची, की नव्याने उभारणी करायची, या निर्णयामध्ये पुलाचे काम रखडले होते. हा पूल ५०० मीटर लांबीचा असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तो बांधला होता. गेल्या १७ वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. पुलावरून धोकादायक वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली होती.
हेही वाचा – किनारपट्टी, पश्चिम घाट परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर
हेही वाचा – भाजपची पुण्यातील चिंतन बैठक लांबणीवर, आता २१ जुलै रोजी नियोजन
कोरेगाव पार्कपासून बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा करण्याचे नियोजित आहे. त्याअंतर्गत साधू वासवानी पूल पाडण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडूनही पूल पाडण्यास परवानगी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नव्या पुलाच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. पूल पाडण्यापूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्थेतही प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले होते. ते यशस्वी ठरल्यानंतर पाडकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुलाच्या पाडकामाला प्रारंभ झाला आहे. नव्या पुलाच्या कामासाठी ८३ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी अंदाजपत्रकात भरीव आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.