पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट, वाकडेवाडी, बारामती आणि इतर ठिकाणच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस स्थानकांमध्ये आधुनिक सुविधांच्या माध्यामातून प्रवाशांना सुलभ सेवा आणि सुलभ प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही पुणे ‘एसटी’महामंडळाचे नवनियुक्त विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली. मंगळवारी त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर स्वारगेट, वाकडेवाडी आणि इतर बस स्थानकांची पाहणी केली.
स्वारगेट बस स्थानकात महिलेवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ आगार प्रमुख आणि व्यवस्थापक या तीन पदावरील अधिकाऱ्यांचे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबन करण्यात आले असताना विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांची देखील बदली करण्यात आली. नेहूल यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी नाशिकचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी पदभार स्विकारला. सिया यांनी बुधवारी सकाळी देखील स्वारगेट, वाकडेवाडी येथील बस स्थानकांच्या परिसरातील पाहणी केली तसेच या ठिकाणी असलेली गर्दी, प्रवाशांच्या अनुषंगाने पुरविण्यात येणाऱ्या सुविधा आणि सुरक्षितता या अनुषंगाने चाचपणी केली. त्यानंतर ‘एसटी’ महामंडळातील १४ बस स्थानकांचा आणि या ठिकाणी असलेल्या चालक, वाहक आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून विविध समस्यांचा आढावा घेतला.
सिया म्हणाले, ‘एसटी’ महामंडळाकडून पुणे विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बसचे नियोजन करण्यात येणार असून प्रवाशांना जास्तीजास्त सुरक्षितता आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. बहुतांश ठिकाणी बस स्थानकांच्या आगाराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी दिसून येत आहे. परिणामी ‘एसटी’च्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे प्रवाशांना उच्च सेवा प्रदान करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येईल. बस स्थानकातील मुलभूत सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी अधिक सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येईल. नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात येईल. लवकरच याबाबत कार्यवाही सुरु करण्यात येईल.’
त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन, अतिरिक्त पदभार, वेतन वाढ, श्रेणीनुसार पदोन्नती आणि इतर प्रश्नांबाबत सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न असतील, असे आश्र्वासित केले असल्याचे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.