पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका महिन्याच्या आत दोन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये दोन नागरिकांना जीव गमवावा लागला. मात्र, या मार्गावर दरड कोसळू नये म्हणून डोंगराला बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या सात वर्षे झाली बदललेल्या नसल्याचे समोर आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते निर्माण मंडळाला (एमएसआरडीसी) वेळोवेळी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची हमी मिळण्यासाठी आणखी किती जणांना जीव गमवावा लागणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा, लोणावळा, बोरघाट परिसरातून हा रस्ता जातो. या मार्गावर पूर्वीदेखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. लोणावळा, खंडाळा परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो. तसेच, उन्हाळ्यातदेखील येथील हवामान दमट असते. त्यामुळे या रस्त्यावर कधीही दरड कोसळण्याची शक्यता असते. द्रुतगती मार्ग तयार करताना या ठिकाणाचे डोंगर हे उभे कापण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता व कापलेले डोंगर यांच्यात अंतर नाही. त्यामुळे थेट रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दरड कोसळण्याची शक्यता आहे. २००८ साली या डोंगराला लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या. पण या जाळ्यांना सात वर्षे झाली तरी त्या बदललेल्या नाहीत. त्यामुळे या जाळ्यांची अवस्था हाताने तोडण्यासारखी झाली आहे. त्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या मोठय़ा दगडांचा भार या जाळ्या पेलवू शकत नाहीत. किमान दोन वर्षांनी या जाळ्यांची पाहणी करून त्या बदलण्याची आवश्यकता असते. पण, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील धोक्याच्या ठिकाणांची माहिती घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना एमएसआरडीसीला करण्यात आल्या होत्या. पण कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यानंतर २२ जूनला खंडाळा परिसरात द्रुतगती मार्गावर दरड कोसळली होती. त्यानंतर पुन्हा या सूचना करण्यात आल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
याबाबत पुणे महामार्ग विभागाचे अधीक्षक सोनावणे यांनी सांगितले, की महामार्ग पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून त्याची माहिती एमएसआरडीसीला दिली होती. द्रुतगती मार्गावर काही ठिकाणी जाळ्या पाण्याने गंजून एवढय़ा तकलादू झालेल्या आहेत की त्या हाताने देखील तुटतात. याबाबतही वेळोवेळी कळविण्यात आले आहे. पण त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा