दत्ता जाधव

पुणे : करडई आणि जवसाचे तेल आरोग्यादायी मानले जाते. मात्र, बदलत्या पीक पद्धतीमुळे करडई आणि जवस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. यंदा राज्यात करडईची लागवड सरासरी क्षेत्राच्या फक्त ४९ टक्के, तर जवस लागवडीचे क्षेत्र ३७ टक्क्यांवर आले आहे. नगदी पिके, फळबागा पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आणि मजूर टंचाईचा परिणाम म्हणून, अशी स्थिती निर्माण झाल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक अधिकारी विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात करडईचे लागवडीखालील सरासरी क्षेत्र सुमारे ४६,४६५ हेक्टर आहे. यंदा त्यापैकी २२,९८१ हेक्टरवर म्हणजे केवळ ४९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जवसाच्या लागवडीचे क्षेत्र आणखी घटले आहे. जवसाचे सरासरी क्षेत्र सुमारे १६,६६९ हेक्टर इतके आहे, तर यंदाची लागवड फक्त ६,११७ हेक्टरवर म्हणजे फक्त ३७ टक्के लागवड झाली आहे. मराठवाडा, वऱ्हाड आणि विदर्भात करडई आणि जवसाचे क्षेत्र मोठे असते. पण, यंदा या ठिकाणीही क्षेत्र घटले आहे. करडईची लागवड यंदा सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, संपूर्ण वऱ्हाड आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली भागात चांगली झाली आहे. मात्र, अन्य ठिकाणी होणाऱ्या लागवडीत मोठी घट झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) वतीने कृषी प्रकल्पअंतर्गत वऱ्हाड आणि विदर्भातील जिल्ह्यांत क्लस्टर तयार करून करडई लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून वऱ्हाड आणि विदर्भात क्षेत्र चांगले राहिले आहे.

कमतरता का?

करडईची लागवड ४९ टक्के, तर जवसाची लागवड केवळ ३७ टक्के क्षेत्रावर झाली आहे. त्यामुळे यंदा उत्पादन कमी होणार आहे. भाजीही कमी..  यंदा बाजारात करडईची भाजीही फारशी दिसून आली नाही. जवसाचे क्षेत्रही औरंगाबाद आणि अमरावती विभागात चांगले राहिले, राज्यात अन्यत्र क्षेत्रात जवसाचे क्षेत्र नगण्याच आहे.

थोडी माहिती..

करडईच्या तेलात औषधी गुण असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर वापरतात. करडईची पाने पाचक असतात. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात.  जवसामध्ये ‘ओमेगा-३’ या मेदाम्लाचे प्रमाण सुमारे ५८% असते. त्यामुळे,हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या अवरुद्ध होत नाहीत. जवस  रक्तातील कॉलेस्टेरॉल चे प्रमाण कमी करते..

Story img Loader