िपपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेला २५ लाख रुपयांचा निधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सरकारला परत केला पाहिजे, अशी भूमिका साहित्य वर्तुळातून घेतली जात आहे. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्यकता आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले असून या निधीबाबत महामंडळ केव्हा निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रतिष्ठानने ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन िपपरी-चिंचवड येथे घेतले होते. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी ‘कॉपरेरेट’ स्वरूपाचे प्रदर्शन घडविल्यामुळे साहित्य महामंडळाच्या आजवरच्या इतिहासामध्ये सर्वात खर्चिक ठरले. या संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेला २५ लाख रुपयांचा निधी त्यांनी समारोपाच्या सत्रात साहित्य महामंडळालाच परत केला. आता या निधीचे करायचे काय, असा प्रश्न साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. हा निधी महामंडळाच्या घटक आणि समाविष्ट संस्थांनी वाटून घ्यावा किंवा साहित्य महामंडळाच्या महाकोशात जमा करावा की सरकारला परत करावा, असे तीन पर्याय खुले असल्याचे महामंडळ सदस्यांच्या चर्चेतून पुढे आले आहेत.
संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेल्या २५ लाख रुपयांच्या निधीचा विनियोग झाला नसल्यामुळे महामंडळाने हा निधी सरकारला परत केला पाहिजे, अशी भूमिका साहित्य महामंडळाचे ज्येष्ठ सदस्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी घेतली आहे. ज्या उद्देशासाठी सरकारने पैसे दिले तो उद्देश संपला असून शिल्लक राहिलेला निधी सरकारला परत केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. हे पैसे सरकारने ८९ व्या संमेलनासाठी दिले होते. महामंडळाने दिलेला हा निधी संयोजक संस्थेने वापरला नाही आणि हा निधी महामंडळाकडेच परत केला आहे. ज्या कारणांसाठी हे पैसे दिले होते ते कारण संपले आहे. ९० व्या संमेलनासाठी नव्याने अनुदान मिळणार असल्याने हा निधी वापरता येणार नाही. त्यामुळे महामंडळ पदाधिकाऱ्यांनी सरकारचा हा निधी सरकारलाच परत केला पाहिजे. ते नियमाला आणि नैतिकतेलाही धरून होईल, असेही ठाले-पाटील यांनी सांगितले. टोरँटो येथील विश्व संमेलन रद्द झाल्यानंतर महामंडळाने २५ लाख रुपयांच्या अनुदानाची रक्कम सरकारला परत केली होती. तोच कित्ता आताही गिरवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महामंडळाचे विश्वस्त निर्णय घेतील
२५ लाख रुपयांच्या निधीसंदर्भात साहित्य महामंडळाचे विश्वस्त निर्णय घेतील, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. साहित्य महामंडळाची बँकेमध्ये दोन खाती आहेत. त्यापैकी नैमित्तिक कामांसाठी पदाधिकारी एका खात्याचा वापर करतात. तर, दुसरे खाते हे महाकोशाचे आहे. सासवड येथील संमेलनामध्ये मराठीप्रेमींकडून संकलित केलेला सहा लाख रुपयांचा निधी आम्ही विश्वस्तांकडे सोपविला होता. विश्वस्तांनी हा निधी महामंडळाच्या महाकोशामध्ये जमा करून घेतला होता. आताही २५ लाख रुपयांच्या निधीसंदर्भातील निर्णय महाकोशाचे विश्वस्त घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा