अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता संमेलनाध्यक्षांची नियुक्ती करावी या विषयावर साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. अर्थात यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी साहित्याचे क्षेत्र निवडणुकीपासून दूर राहावे याविषयीच्या चर्चेचा मार्ग खुला झाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा वर्धापनदिन छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर येथे साजरा झाला. त्यानिमित्ताने झालेल्या महामंडळाच्या बैठकीमध्ये ही प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी दिली. कोशाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. रवी बापट यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांच्या वर्धापनदिन कार्यक्रमात आत्मचरित्र-आत्मकथन या रुपबंधावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे ‘अक्षरयात्रा’ या महामंडळाच्या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.
साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीच्या सध्याच्या प्रक्रियेसंदर्भात सातत्याने चर्चा सुरू असते. निवडणूक न घेता नियुक्ती करावी ही मागणी सातत्याने जोर धरत आहे. अर्ज भरणे, मतदारांशी पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटी या बाबी मान्य नसल्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक या निवडणुकीच्या फंदामध्ये पडत नाहीत. या प्रक्रियेमुळे दिग्गज सााहित्यिकांना संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळू शकलेला नाही. त्यामुळे लोकशाही पद्धत चांगली असली तरी, अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यापेक्षा अध्यक्षांची निवड करावी का, या विषयावर महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. महामंडळाच्या पुढील बैठकीमध्ये यासंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
अर्थात हा प्रस्ताव संमत झाला तरी त्यासाठी महामंडळाच्या घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी घटनादुरुस्ती समितीची स्थापना करून घटनेमध्ये हे कलम समाविष्ट करावे लागेल. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवावे लागेल. त्यांच्या मान्यतेनंतर या बदलाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. आपणहून अर्ज करण्यास नकार देत आहेत अशा ज्येष्ठ साहित्यिकांची विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केले नाही अशा व्यक्तींची सूची संबंधित घटक संस्थेला पाठविण्यात येणार आहेत. अशा व्यक्तींना पुढील वर्षीसाठी मतदार करून घ्यायचे की नाही याचा निर्णय त्या संस्थेने घ्यायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
मतपत्रिका पोस्टानेच येणार
मतपत्रिका मिळत नाहीत ही तक्रार असल्यामुळे यंदा रजिस्टर एडीने मतपत्रिका रवाना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल ही अपेक्षा होती. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही मतदानाच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मात्र, रजिस्टर एडी या माध्यमाद्वारे मतपत्रिका पाठविण्याचा खर्च ५० हजार रुपये आला आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तर साध्या पोस्टानेच मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. पोस्टाने मतपत्रिका पाठविण्याचा खर्च १० हजार रुपये येतो. रजिस्टर एडीने पाठविलेले पत्र संबंधित व्यक्तीलाच घ्यावे लागते. त्यामुळे मतपत्रिकेसाठी पोस्टमन किती वेळा घरी जाणार हाही प्रश्न उपस्थित झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader