पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा रविवारी करण्यात आली. त्यानुसार एकापेक्षा अधिक उमेदवारांची नावे सुचविल्याने निवडणूक झालीच, तर मतमोजणी होऊन ६ नोव्हेंबर रोजी नूतन संमेलनाध्यक्ष निश्चित होणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोज आडकर या वेळी उपस्थित होते.
साहित्य महामंडळाच्या घटक-समाविष्ट-संलग्न संस्थांसह निमंत्रक संस्थेने मतदार याद्या २५ ऑगस्टपर्यंत महामंडळाकडे पाठवावयाच्या आहेत. महामंडळाने मतदारांची संपूर्ण यादी ३१ ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायची आहे. नियोजित अध्यक्षपदासाठी साहित्य महामंडळाकडे नावे सुचविण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ही अंतिम मुदत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्जाची छाननी करून अध्यक्षपदाच्या उमेदवारांची नावांची घोषणा त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता करावयाची आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची मुदत ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत.
संमेलन अध्यक्षपदासाठी मतदान होणार असेल, तर निवडणूक निर्णय अधिकारी मतदारांकडे पोस्टाने १५ सप्टेंबर रोजी मतपत्रिका रवाना करणार आहेत. मतदारांनी आपले मतदान करून मतपत्रिका साहित्य महामंडळाकडे पाठवावयाची आहे. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत पोहोचणाऱ्या मतपत्रिकांचा विचार केला जाणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निवडणूक निर्णय अधिकारी नव्या संमेलनाध्यक्षांच्या नावाची घोषणा करणार आहेत, असे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा