समाजाला अभिरुचीची सवय संगीताने लावली आहे. आज या अभिरुचीमुळेच समाज आणि कलाकार उच्च अवस्थेला पोहोचतो. संगीत साधना करण्याकरिता श्रद्धा महत्त्वाची असून संगीतामुळेच समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण होते, असे मत ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
श्रीरामनवमीनिमित्त बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे तळवलकर यांच्या हस्ते प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे यांना साई पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, फळांची परडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा, गंधाली शहा या वेळी उपस्थित होते.
पं. तळवलकर म्हणाले, संगीताने समाजामध्ये मोठय़ा प्रमाणात सुसंस्कृतपणा आणला आहे. संगीताची सेवा करण्यातून माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध होतात. गणेशोत्सव मंडळांमध्ये सामाजिक क्षेत्रासह सांस्कृतिक क्षेत्रातील जाण वाढत असून हे बदलते स्वरूप आनंददायी आहे.
देखणे म्हणाले, परमेश्वराने विश्व निर्माण केले, तेव्हा सौंदर्याची निर्मिती केली. याच सौंदर्याने माणूस हरखून गेला. तो बोलू लागला तेव्हा कवी झाला आणि डोलू लागला तेव्हा तालयोगी झाला. संगीताच्या अंगाने परमेश्वराच्या जवळ जाण्याची ताकद भारतीय संस्कृतीला लाभली आहे. गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून पुण्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांचे विद्यापीठ उभे राहिले आहे. यामुळे सामाजिक प्रबोधनाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
मंडळातर्फे साईभंडारा उत्सवांतर्गत पाककृती स्पर्धा, नृत्यसंध्या, भजन या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पीयुष शहा यांनी प्रास्ताविक केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.