पुणे : बालरंगभूमीवर विपुल कार्य करून ‘सख्खे शेजारी’ या नाटकाचे दिग्दर्शन करणाऱ्या सई परांजपे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत रसिकांसमोर येत आहेत. त्यांनीच लिहिलेल्या एका नव्या नाटकाचा दसऱ्याला मुहूर्त होत असून त्यामध्ये मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वयाची ऐंशी पार केलेल्या दाम्पत्याची कथा असलेले हे नाटक म्हणजे ‘ब्लॅक कॉमेडी’ आहे, असे वयाची ८५ वर्षे पार केलेल्या सई परांजपे यांनी शनिवारी सांगितले.
मुंबई दूरदर्शनच्या (डीडी-सह्याद्री) ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त दूरदर्शनच्या पहिल्या कार्यक्रम निर्मात्यांपैकी एक असलेल्या सई परांजपे यांचे ‘सय’ हे आत्मचरित्र आता १५ ऑक्टोबरपासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मालिका स्वरूपात २६ भागांमध्ये प्रसारित होत आहे. ही माहिती सई परांजपे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यानिमित्ताने परांजपे यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना नाटकाचे दिग्दर्शन करत असल्याची घोषणा केली.
हेही वाचा >>> महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत; बालिकेच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यात डॉक्टरांकडून बचत
दिग्दर्शक म्हणून मला ओळखत असले तरी मी मूळची लेखक आहे. माझे बरेचसे लेखन अद्याप अप्रकाशित आहे. त्यामध्ये अनेक पटकथा आणि नाटकाचे लेखन आहे. त्यामुळे अद्याप प्रकाशात न आलेले लेखन हे नाट्यसंहितेच्या माध्यमातून रसिकांसमोर येत आहे. सध्या तरी ‘इवलेसे रोप‘ असे या नाटकाचे नाव ठेवले आहे. कदाचित ते बदलले जाईल. मी लिहिलेले नाटक मीच दिग्दर्शित करत आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कितीही काम केले तरी रंगभूमीची मजा काही औरच आहे, अशी भावना सई परांजपे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> पुणे: दावोस दौऱ्यात ३२ कोटींचा खर्च; उद्योगमंत्री सामंत यांची स्पष्टोक्ती
लेखणी मला प्यारी आहे. पण, मी एकटाकी लिहू शकत नाही. प्रत्येक लेखनाचे किमान पाच-सहा खर्डे माझ्याजवळ आहे. त्याची शिक्षा मला मिळाली असून उजवा हात जवळपास निकामी झाला आहे. केवळ सही करण्यापुरताच माझा हात चालतो, असे सांगताना सई परांजपे यांनी ‘बँकेत प्रत्येक चलनावर माझी सही वेगळी असते’, अशी गमतीशीर टिप्पणी केली.
मुलांना चांगले मनोरंजन मिळायलाच हवे. त्यामुळे प्रत्येक कलाकृतीतून उपदेशाचे डोस देणं मला आवडत नाही. लोकांना शहाणपणा शिकविणारी मी कोण? आपल्या कलाकृतीतून रसिकांना आनंद झाला पाहिजे यासाठी ती निर्मिती असते. उगाच त्यांच्या डोक्यावर हातोडा कशाला मारायचा? असे परांजपे यांनी स्पष्टपणे सांगितले. महिला दिग्दर्शक असल्याने खेड्यापाड्यात, झोपडीमध्ये चित्रीकरण करताना सहकार्य केले गेले. हा निश्चित फायदा झाला. सरकार दफ्तरी लवकर कामे होतात. त्याचा मी जरूर फायदा घेतला. पण, ज्या गोष्टींमध्ये आपले प्रभुत्व नाही तिथे दिग्दर्शक म्हणून वर्चस्व गाजवायचे नाही हे तत्त्व आयुष्यभर सांभाळले, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यामध्ये माझे हक्काचे छप्पर नाही. पण, पुणे हे माझे हक्काचे शहर तर नक्कीच आहे. प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या हृदयामध्ये माझे हक्काचे घर आहे. – सई परांजपे, ज्येष्ठ दिग्दर्शिका