कोथरूड येथील जय भवानीनगरमधील साई पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी गेल्यानंतर मीटरमध्ये फेरफार करून महिलेकडून महिलेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या महिलेने पेट्रोलपंप व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी भानगडीत कशाला पडता म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तिघांना अटक आहे.
अनघा अशोक घैसास (वय ४६, रा. पौड रस्ता) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून विलास बाजीराम कदम (वय २७, रा. उत्तमनगर, वारजे), बाबु ऊर्फ नितीन मोहन शिंदे (वय २८, रा. काळेवाडी) आणि लियाकत सिकंदर शेख (वय ४८, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय भवानीनगर येथील साई पेट्रोल पंपावर घैसास या फोक्सव्ॉगन-पोलो मोटारीत डिझेल भरण्यासाठी शुक्रवारी दुपारी गेल्या होत्या. त्यांनी मोटारीत २३७२ रुपयांचे डिझेल भरले. मात्र, आरोपी शिंदे याने त्यांचे लक्ष विचलित होण्यासाठी टाकी भरली का हे पाहण्यासाठी मोटार सुरू करण्यास सांगितले. तोपर्यंत आरोपीने मीटरवर २९६० रुपयांचा आकडा आणला. हे प्रकार पाहून घैसास यांनी पेट्रोलभरणाऱ्या तरुणाकडे चौकशी सुरू केली. त्यांच्या मोटारीत तीन हजार रुपयांचे डिझेल बसते आणि अगोदरच मोटारीत डिझेल असल्यामुळे मीटरमध्ये फेरफार असल्याचा आरोप केला. त्याच्याशी वाद सुरू केला. तोपर्यंत आरोपींनी मूळ आकडा मीटरवर आणला. शेवटी पेट्रोलपंपाचा व्यवस्थापकाला बोलवून घेतले. पण, त्याने त्यांनाच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही कशाला या भानगडीत पडता. हा प्रकार महागात पडेल,’ अशी धमकी दिली. त्यामुळे घैसास यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविले. पाच मिनिटांच्या आत पोलीस घटनास्थळी पोहोचून तिघांना पोलीस चौकीत घेऊन गेले. सुरुवातीस या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, नंतर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे यांनी सांगितले, की भारत पेट्रोलियम कंपनीला पत्रव्यवहार करून याबाबत कळविले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.                                                                                      

Story img Loader