देखभाल दुरुस्तीसाठी महिन्यात किमान एकदा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची जी-२० मधील कोणत्याच देशात अस्तित्वात नसलेली पद्धत परदेशी पाहुण्यांना दाखविल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन, अशा शब्दात सजग नागरिक मंचाने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे. पाणीपुरवठा बंद ठेवून नक्की देखभाल दुरुस्ती काय केली जाते आणि ती दर महिन्याला का करावी लागते यासारख्या  गोष्टी नागरीकांपर्यंत पोचू न देण्याचे कौशल्यही परदेशी पाहुण्यांना शिकवावे, असा उपरोधिक टोलाही मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिकेला लगाविला आहे.

हेही वाचा >>> दुभंगलेल्या ओठांसह जन्मलेल्या बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य ! देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी मोहीम

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून महिन्यातून एका गुरूवारी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशीही शहरात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होता. महापालिका दर महिन्यात जलकेंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कोणती कामे करते, याबाबत सातत्याने विचारणा होत आहे. शहरात जी-२० ची परिषदेच्या कृती गटाची बैठक सुरू असतानाच पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्याचे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत उपरोधिक विचारणा केली आहे.

हेही वाचा >>> आळंदी आमचे श्रद्धास्थान; आळंदीत चर्च उभं राहणार नाही याची काळजी घेऊ- हिंदू महासंघ

जी-२० साठी शहरात दाखल झालेल्या देशोदेशीच्या पाहुण्यांना शहरातील विविध विकासकामांचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्याबरोबर पाणीपुरवठा विभागाने जाहीर प्रकटन देऊन देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची जी-२० मधील कोणत्याच देशात अस्तित्वात नसलेली पद्धत पाहुण्यांना दाखविली आहे. मुंबई शहरातही अशी पद्धत नाही.  नागरीकांना पाणीबचतीसाठी प्रोत्साहित करणारी ही योजना नक्कीच देशोदेशीचे पाहुणे आपापल्या देशात राबवतील आणि पुणे महापालिकेच्या कल्पकतेचे प्रदर्शन संपूर्ण जगाला घडेल. ही सर्व पुणेकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. दर महिन्याला देखभाल दुरुस्ती साठी महिन्यात किमान एकदा तरी पाणीपुरवठा बंद ठेऊन नक्की देखभाल दुरुस्ती काय केली जाते आणि ती दर महिन्याला का करावी लागते, यासारख्या  गोष्टी नागरीकांपर्यंत पोचू न देण्याो कौशल्यही पाहुण्यांना शिकवावे, अशी उपरोधिक टीका वेलणकर यांनी केली आहे.

Story img Loader