मराठा समाजाला ४० दिवसात आरक्षण दे दिलेले आश्वासन न पाळता राज्य शासनाने फसवणूक केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आकुर्डीतील तहसील कार्यालयावर २ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला. आंदोलकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
हेही वाचा >>> अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करावी – आमदार रविंद्र धंगेकर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात लाक्षणिक, साखळी उपोषण सुरु आहेत. आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मेणबत्ती पदयात्रेनंतर आता मराठा आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. आकुर्डीतील खंडोबामाळापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एक मराठा, लाख मराठा, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. प्रकाश जाधव,मारूती भापकर,धनाजी येळकर पाटील यावेळी उपस्थित होते. आकुर्डी येथे तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चासोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.